Dugout Rules: आयपीएल सामन्यादरम्यान 'डगआउट'मध्ये मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राजस्थान रॉयल्सचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा न करण्याबाबत कडक ताकीदही देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या शेजारी बसलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याला मात्र या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.
BCCI कडून 1 लाखांचा दंड आणि ताकीद
'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, BCCI च्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACU) रोमी भिंदर यांना अधिकृत पत्र पाठवून या कारवाईची माहिती दिली आहे. डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल त्यांना दोषी धरत 1 लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही संशयास्पद आरोपांबाबत त्यांना 'क्लीन चिट' देण्यात आली असली, तरी केवळ प्रोटोकॉल तोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती, मात्र आता दंडात्मक कारवाईनंतर त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे.
नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
ही घटना 10 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यातील सामन्यादरम्यान घडली होती. राजस्थानची फलंदाजी सुरू असताना रोमी भिंदर डगआउटमध्ये फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. आयपीएलच्या नियमांनुसार, संघाच्या व्यवस्थापकांना मोबाईल बाळगण्याची मुभा असली, तरी प्रत्यक्ष सामना सुरू असताना डगआउटमध्ये त्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. या घटनेच्या वेळी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी हा भिंदर यांच्या फोनकडे पाहत असल्याचे दिसले होते, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे वापरला होता फोन
या प्रकरणात भिंदर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी ते फुफ्फुसाच्या विकाराने त्रस्त होते आणि त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करावे लागले होते. आपल्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी त्यांनी फोन वापरण्याची परवानगी घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, BCCI ने खेळाच्या शिस्तीला प्राधान्य देत, या तांत्रिक नियमाच्या उल्लंघनासाठी अखेर दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबतचे नियम किती कडक आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.