T20 World Cup 2026: यंदा टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने साखळी फेरीत अपराजित राहत 'सुपर 8' मध्ये धडक मारली आहे. मात्र, पुढचा प्रवास सोपा नाही. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांसारख्या बलाढ्य संघांशी भिडण्यापूर्वी भारतीय संघाच्या काही गंभीर उणिवा समोर आल्या आहेत, ज्यामुळे विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाला धक्का लागू शकतो.
फिरकी गोलंदाजीसमोर लोटांगण
भारतीय फलंदाजांना फिरकीपटूंवर (Spinners) वर्चस्व गाजवता येत नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषतः ऑफ-स्पिनर्सना खेळताना टीम इंडियाची दमछाक होत आहे. तथापी, भारतीय संघात अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल यांसारख्या डावखुऱ्या खेळाडूंची मोठी फळी आहे. यामुळे विरोधी संघांना 'फिंगर स्पिन' वापरून भारताला रोखणे सोपे जात आहे. याशिवाय, स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सलग 3 वेळा शून्यावर बाद झाल्याने सलामीची जोडी चिंतेचा विषय ठरली आहे.
आकडेवारी काय सांगते?
या स्पर्धेत भारताने आतापर्यंत फिरकीच्या 42 षटकांचा सामना केला असून, त्यात 7 च्या सरासरीने 315 धावा केल्या आहेत. मात्र, फिरकीपटूंनी भारताचे तब्बल 15 बळी घेतले आहेत.
क्षेत्ररक्षणातील ढिसाळपणा
केवळ फलंदाजीच नाही, तर भारताचे क्षेत्ररक्षणही चिंतेची बाब ठरली आहे. साखळी फेरीत अनेक सोपे झेल सोडल्याने संघाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेदरलँड्स आणि अमेरिकेसारख्या दुय्यम संघांच्या फिरकीपटूंनीही भारताला चांगलेच झुंजवले आहे.
हेही वाचा - IND vs PAK Match Viewership Record : इंडिया पाकिस्तान सामन्यादरम्यान व्ह्यूअरशिपचे सर्व रेकॉर्ड ब्रेक
'विरोधी संघांना खेळ सोपा होतोय'; प्रशिक्षकांची कबुली
दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी संघाच्या या कमकुवत बाजूवर बोट ठेवले आहे. ते म्हणाले. 'आमच्या संघात डावखुऱ्या खेळाडूंची संख्या अधिक असल्याने विरोधी संघ सातत्याने फिंगर स्पिनचा वापर करत आहेत. ते चेंडूचा वेग कमी करून आम्हाला अडचणीत आणत आहेत. सध्या आमच्याकडे पर्यायांची कमतरता असून संजू सॅमसनसारखा खेळाडू बेंचवर बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या सामन्यापूर्वी आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल.'