India vs Pakistan : ICC च्या कडक पवित्र्यासमोर पाकिस्तान नरमले; भारत-पाक सामन्यावरील बहिष्काराच्या नाट्याला नवे वळण

15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा अहंकार आयसीसीच्या कठोर भूमिकेनंतर काहीसा मवाळ झाल्याचे दिसत आहे.

India vs Pakistan : ICC च्या कडक पवित्र्यासमोर पाकिस्तान नरमले; भारत-पाक सामन्यावरील बहिष्काराच्या नाट्याला नवे वळण

India vs Pakistan : यंदाच्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावरून निर्माण झालेला पेच आता अधिक गडद झाला आहे. 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा अहंकार आयसीसीच्या कठोर भूमिकेनंतर काहीसा मवाळ झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तान सरकारने हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला असला, तरी आयसीसीने कारवाईचा इशारा दिल्याने आता दोन्ही बाजूंनी चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे.

कायदेशीर कारवाई आणि निर्बंधांचा आयसीसीचा इशारा
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 'असाधारण परिस्थिती'चे कारण देत आयसीसीला पत्र लिहिले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, जर पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला, तर त्यांना कडक कायदेशीर कारवाई आणि विविध निर्बंधांना सामोरे जावे लागेल. आयसीसीने पीसीबीला ही 'असाधारण परिस्थिती' नेमकी काय आहे आणि त्याचे ठोस पुरावे काय आहेत, याची विचारणा केली आहे. स्पर्धेची अखंडता आणि नियमांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही आयसीसीने ठणकावून सांगितले आहे.

हेही वाचा – India Pakistan Cricket Match: 15 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर; पीसीबीने आयसीसीसमोर ठेवली मोठी अट

पीसीबी आणि आयसीसीमध्ये संवादाची तयारी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, आयसीसीने स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. विशिष्ट सामन्यातून माघार घेतल्यास त्याचे जागतिक क्रिकेटवर काय परिणाम होतील, याची जाणीव पाकिस्तानला करून देण्यात आली आहे. आयसीसीच्या या कडक पवित्र्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघर्षाऐवजी संवादाची तयारी दर्शवली आहे. सध्या हा तिढा सोडवण्यासाठी आयसीसी आणि पीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे.

भारत-पाक सामन्यावर प्रश्नचिन्ह कायम
पाकिस्तान सरकारने त्यांच्या अधिकृत ट्विटमध्ये टीम इंडियासोबत न खेळण्याचे संकेत दिले असले, तरी क्रिकेट बोर्डाची कोंडी झाली आहे. एका बाजूला सरकारचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला आयसीसीची कारवाई अशा कात्रीत पाकिस्तान अडकला आहे. 15 फेब्रुवारीच्या सामन्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसला, तरी आयसीसीने स्पष्ट केलेल्या परिणामांमुळे पाकिस्तानला माघार घेणे आता कठीण जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number