मुंबई : दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना तब्बल दीड वर्षांच्या नूतनीकरणानंतर नव्या स्वरूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचे लोकार्पण (Shivaji Park Gymkhana Opening) करण्यात आले. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय क्रिकेटची 'नर्सरी'
शिवाजी पार्क जिमखाना भारतीय क्रिकेटची 'नर्सरी' म्हणून ओळखला जातो. याच मैदानावर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे या जिमखान्याशी विशेष नाते आहे. महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी याच ठिकाणी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. 1909 साली स्थापन झालेला हा जिमखाना मुंबईतील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो. 19 सप्टेंबर रोजी जिमखान्याला 'ऑक्युपेशन सर्टिफिकेट' मिळाल्यानंतर, अवघ्या तीन दिवसांत 3,000 हून अधिक सदस्यांसाठी त्याचे दरवाजे उघडले गेले आहेत.
हेही वाचा – IND vs PAK: भारताचा पुन्हा एकदा दणदणीत विजय, पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं
सचिन तेंडुलकर झाले भावूक
उद्घाटन सोहळ्यात सचिन तेंडुलकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. "मला आठवतं, मी माझं बालपण इथेच घालवलं," असे भावूक उद्गार त्यांनी काढले. जिमखान्याच्या नूतनीकरणात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. विशेषतः राज ठाकरे यांच्या योगदानाचे कौतुक करताना ते म्हणाले, "राज ठाकरे यांची या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी केवळ परवानग्या मिळवण्यासच मदत केली नाही, तर याच्या डिझाइनमध्येही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते."
महिला क्रिकेटला प्रोत्साहन
या ऐतिहासिक जिमखान्याने आता महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूम आणि शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
शिवाजी पार्क जिमखान्याचा इतिहास
– या जिमखान्याची स्थापना 1909 मध्ये 'न्यू महाराष्ट्र क्रिकेट क्लब' म्हणून झाली होती.
– अनेक वेळा स्थलांतर आणि नामकरणानंतर ते शिवाजी पार्क जिमखाना म्हणून ओळखले जाऊ लागले.
– 1931 मध्ये सध्याच्या क्लबहाऊसचे उद्घाटन झाले.
– 1942 पर्यंत जिमखान्याचे क्षेत्रफळ 19,000 चौरस यार्डपर्यंत वाढले.
हेही वाचा – Ind vs Pak Asia Cup 2025: अभिषेक-शुभमनचा पाक खेळाडूला शाब्दिक तडाखा; शाहीन-हारीससोबत मैदानावर वाद