नवी मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा रोमांचक विजय झाला आहे. जेमिमा रॉड्रिग्जचं वादळी शतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या 89 रनच्या खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं 339 रनचं आव्हान पार केलं आहे. महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, मात्र या पराभवाचा बदला भारताने सेमी फायनलमध्ये घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. वर्ल्ड कपमधली पहिलीच मॅच खेळणारी शफाली वर्मा 5 बॉलमध्ये 10 रन करून आऊट झाली. यानंतर जेमिमाने स्मृती मंधानाच्या साथीने ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण स्मृतीला वादग्रस्त आऊट दिलं गेलं. यानंतर जेमिमाने हरमनप्रीतसोबत 167 रनची पार्टनरशीप केली.
हेही वाचा: IND vs AUS Semi Final: भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅच पावसामुळे रद्द झाल्यावर काय होईल?, जाणून घ्या नियम काय सांगतो
पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्ड कप सेमी फायनल मॅचवर पावसाचे सावट होते. जर 30 ऑक्टोबरला सामना पावसामुळे रद्द झाला असता, तर तो राखीव दिवशी खेळला जाणार होता. मात्र जर त्या दिवशीदेखील पाऊस झाला असता तर सामना रद्द झाला असता. अशावेळी ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत प्रवेश करणार होती. कारण गट टप्प्यात ती भारतापेक्षा वरच्या स्थानावर होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा विजय खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे.