सूर्यांश शेडगेची फटकेबाजी अन् गुरजपनीतची भेदक गोलंदाजी; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव

मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला मालिका विजय मिळवता आला नाही; तरीही शेवटच्या सामन्यात मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे भारताने या दौऱ्याचा शेवट अत्यंत आत्मविश्वासाने केला आहे.
सूर्यांश शेडगेची फटकेबाजी अन् गुरजपनीतची भेदक गोलंदाजी; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव
India A vs Australia A 3rd ODI 2026

पुद्दुचेरी येथील सिचेम (SICHEM) स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात इंडिया ‘ए’ संघाने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा 49 धावांनी दणदणीत पराभव केला. मालिकेतील पहिले 2 सामने गमावल्यामुळे भारतीय संघाला मालिका विजय मिळवता आला नाही; तरीही शेवटच्या सामन्यात मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे भारताने या दौऱ्याचा शेवट अत्यंत आत्मविश्वासाने केला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 47.3 षटकांत 275 धावा उभारल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुणा ऑस्ट्रेलियन संघ 46.2 षटकांत 226 धावांत ढेपाळला.

प्रियांश-प्रभसिमरनची सलामी अन् सूर्यांश शेडगेचे तडाखेबंद अर्धशतक

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाला सलामीवीर प्रियांश आर्य (49 धावा) आणि प्रभसिमरन सिंग (39 धावा) यांनी 83 धावांची आक्रमक भागीदारी रचून दणकेबाज सुरुवात करून दिली. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर देवदत्त पडिक्कल (2 धावा) आणि प्रियांश लवकर बाद झाल्याने डाव काहीसा अडखळला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने 33 धावांचे योगदान दिले, पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होत राहिल्याने भारतीय संघ संकटात सापडला होता. अशा नाजूक वेळी सूर्यांश शेडगेने अवघ्या 60 चेंडूंत 66 धावांची धुवाधार खेळी उभारली. त्याला विपराज निगमने 40 धावा करून उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुइस आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले.

गुरजपनीत सिंगचा मारा

विजयासाठी दिलेल्या 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ ची सुरुवात बऱ्यापैकी झाली होती. सलामीवीर जोश फिलिपने 56 धावांची लढाऊ खेळी केली. याशिवाय नॅथन मॅकस्वीनी (39 धावा), लॅचलॅन शॉ (31 धावा) आणि निखिल चौधरी (29 धावा) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत नियमित अंतराने बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियावर सतत दबाव कायम ठेवला.

हेही वाचा – ‘ती चूक.. त्या एका षटकामुळे सामना हातातून गेला!’; पराभवानंतर गावस्करांचा थेट प्रहार, कर्णधारासह प्रशिक्षकालाही सुनावले

भारताचा वेगवान गोलंदाज गुरजपनीत सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत 3 महत्त्वाचे बळी टिपले आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला योग्य साथ देत यश ठाकूर आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर विपराज निगम व अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. सर्वसमावेशक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात विजयश्री खेचून आणली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version