भारतीय लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यासंदर्भात त्याने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी त्याने आपल्या कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच युझवेंद्र चहलने 72 एकदिवसीय आणि 80 टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट 2023 मध्ये झालेला एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. 36 वर्षीय चहलने लॉर्ड्सवर नॉर्थम्प्टनशायरकडून आपला शेवटचा रेड बॉल क्रिकेट मॅच खेळली. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवणे हे त्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. असं म्हणत त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
युझवेंद्र चहलची क्रिकेटमधील कारकीर्द
चहलने भारतीय संघासाठी अद्याप कसोटी सामना खेळलेला नाही. मात्र, प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 49 सामन्यांत 32.27च्या सरासरीने 148 विकेट्स घेतल्या आहेत. 2009 मध्ये युझवेंद्र चहलने हरियाणाकडून प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा अखेरचा प्रथम-श्रेणी सामना मिडलसेक्सविरुद्ध झाला. या सामन्यात मिडलसेक्सने नॉर्थम्प्टनशायरचा सात विकेट्सनी पराभव केला. 2016-17 रणजी ट्रॉफी हंगामात दोनपेक्षा जास्त सामने खेळले होते. त्या हंगामात सात सामन्यांत त्याने 22.60च्या सरासरीने 33 विकेट्स घेतल्या होत्या. याव्यतिरिक्त 2026 च्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 मध्ये त्याने 16.14 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या. तसेच अलीकडेच तो नॉर्थम्प्टनशायरकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळला. याशिवाय त्याने 72 वनडे आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचसोबत आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे
युझवेंद्र चहल पोस्टमध्ये म्हणाला की,
“मी हातात घेतलेला पहिला क्रिकेटचा चेंडू लाल रंगाचा होता. मी 10 वर्षांचा होतो, आणि तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी या खेळाच्या इतका प्रेमात पडेन. माझ्यासाठी, लाल चेंडूचे क्रिकेट कधीही केवळ एक प्रकार नव्हते. इथेच मी संयम, चारित्र्य, चिकाटी आणि प्रत्येक धाव व प्रत्येक विकेटसाठी तासन्तास मैदानावर झुंज देण्याचा खरा आनंद शिकलो. मी माझा शेवटचा प्रथम-श्रेणी सामना लॉर्ड्सवर खेळलो. हे शब्द उच्चारताना खूप भावूक होतो, कारण कसोटी संघात स्थान मिळवणे हे माझे नेहमीच एक स्वप्न होते, जे मी अनेक वर्षे मनात बाळगले होते. ते कदाचित पूर्ण झाले नसेल, पण माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाने मी खरोखरच समाधानी आहे आणि या प्रकारात मला मिळालेल्या प्रत्येक संधीबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे.”
“लाल चेंडूने मला माझ्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणी दिल्या आहेत, आणि त्या आठवणी कोणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही. पण मी अजून थांबलेलो नाही. माझ्या देशासाठी खेळण्याची भूक अजूनही कायम आहे. माझा विश्वास आहे की माझ्यात अजूनही क्रिकेट खेळण्याची क्षमता शिल्लक आहे, आणि एकदिवसीय व टी-२० प्रकारात आणखी एक संधी मिळवण्यासाठी मी माझे सर्वस्व देईन. माझ्या या प्रवासात सतत पाठिंबा, विश्वास आणि श्रद्धा दाखवल्याबद्दल हरियाणा क्रिकेट असोसिएशन, श्री. रणबीर सिंग महिंद्रा सर आणि श्री. अनिरुद्ध सिंग चौधरी सर यांचे विशेष आभार. वयाच्या 10 व्या वर्षी पहिला लाल चेंडू हातात घेण्यापासून ते आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळण्यापर्यंत, हा एक अविश्वसनीय प्रवास राहिला आहे.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.