IND WA vs PAK WA: भारतीय महिला संघाच्या तरुण खेळाडूंनी शानदार कामगिरी करून क्रिकेट चाहत्यांना मोठा आनंद दिला आहे. रायझिंग स्टार्स आशिया कप (Rising Stars Asia Cup 2026) मध्ये भारत अ महिला संघाने पाकिस्तान अ संघाचा दारूण पराभव केला. बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या या एकतर्फी सामन्यात भारताच्या मुलींनी 8 विकेट्सनी दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 18.5 षटकात अवघ्या 93 धावांवर गारद झाला. टीम इंडियासमोर विजयासाठी सोपे लक्ष्य होते, जे गाठण्यात भारतीय फलंदाजांना कोणतीही अडचण आली नाही.
सामना 59 चेंडू शिल्लक असताना संपला
या सामन्यात टीम इंडियाचे वर्चस्व किती होते, याचा अंदाज यावरून येतो की भारताने 59 चेंडू शिल्लक असतानाच विजय मिळवला. डावाच्या सुरुवातीला हुमैरा काझी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने धक्का बसला होता, मात्र त्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा यांनी डाव सावरला. वृंदा दिनेशने अवघ्या 29 चेंडूत 55 धावांची धमाकेदार नाबाद खेळी केली. तिच्या या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने केवळ 10.1 षटकात लक्ष्य गाठून पाकिस्तानला धूळ चारली.
हेही वाचा - Ishan Kishan Wedding : इशान किशन बोहल्यावर चढणार ?; आजोबांनी लग्नाबाबत केला केला मोठा खुलासा
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचे फलंदाज पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. या सामन्यात भारताच्या पाच गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. साईमा ठाकूर, कर्णधार राधा यादव आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. पाकिस्तानच्या 8 फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. सलामीवीर शवाल झुल्फिकारने सर्वाधिक 23 धावा केल्या. या स्पर्धेत पाकिस्तानचा हा पहिलाच पराभव ठरला आहे.
स्पर्धेतील भारताचे स्थान मजबूत
या मोठ्या विजयामुळे 'रायझिंग स्टार्स आशिया कप'मध्ये भारताचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. तरुणांना संधी देण्याच्या उद्देशाने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय मुलींनी दाखवलेला हा आत्मविश्वास आगामी सामन्यांसाठी शुभसंकेत आहे. पाकिस्तानने मागील सामन्यात नेपाळचा पराभव केला होता, मात्र भारताच्या 'ए' संघासमोर त्यांचा निभाव लागला नाही.