Rajat Patidar: आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात रोमांचक विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं. रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 2 विकेट्स राखून बाजी मारली. मात्र, या विजयानंतर संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने केलेल्या एका वक्तव्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 166 धावा केल्या होत्या. सुरुवातीलाच मुंबईचे प्रमुख फलंदाज बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला होता. मात्र तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी डाव सावरत संघाला लढाऊ धावसंख्या उभी करून दिली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने प्रभावी गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
हेही वाचा: RCB vs MI: यंदा पहिली मॅच जिंकली, पण अख्खा सीझनच देवाला! शेवटच्या चेंडूवर RCBची बाजी; MI प्लेऑफमधून बाहेर
167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात अत्यंत खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि जेकब बेथेलही स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे सामना मुंबईच्या बाजूने झुकल्याचं दिसत होतं. अशा वेळी कृणाल पंड्याने जबाबदारी स्वीकारत दमदार खेळी केली. पायात त्रास होत असतानाही त्याने संयमी फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेलं. जितेश शर्मानेही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण योगदान दिलं.
सामन्याचा निकाल अखेरच्या षटकात लागला. शेवटच्या काही चेंडूंमध्ये आरसीबीला विजयासाठी धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारने मारलेला षटकार निर्णायक ठरला. अखेर शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेत आरसीबीने सामना आपल्या नावावर केला.
हेही वाचा: MI Vs RCB IPL 2026: सूर्याचा तो 'अजब' प्रयोग अन् मुंबईचा घात; अनुभवी गोलंदाज असताना राज बावाच्या हाती चेंडू का दिला? पाहा कॅप्टन सूर्यकुमारचं उत्त
सामन्यानंतर बोलताना कर्णधार रजत पाटीदारने संघाच्या फलंदाजीवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आम्ही हा सामना जिंकण्याचे हकदार नव्हतो. आमच्या फलंदाजीच्या ताकदीचा विचार करता हे लक्ष्य सहज पार करता आलं असतं,” असं वक्तव्य त्याने केलं. त्याचबरोबर कृणाल पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्या कामगिरीचंही त्याने कौतुक केलं.
रजतच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. काहींनी त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं, तर काहींनी विजय मिळाल्यानंतर अशा प्रतिक्रिया देण्यावर आश्चर्य व्यक्त केलं. मात्र या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठत प्लेऑफच्या शर्यतीत आपली पकड आणखी मजबूत केली आहे.