PBKS vs RCB IPL 2026 : IPL सामन्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2026 च्या 61 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आपल्या विजयाचा क्रम कायम ठेवत पंजाब किंग्सचा 23 धावांनी पराभव केला. या शानदार विजयासह आरसीबीने यंदाच्या हंगामातील आपला 9 वा विजय नोंदवला असून, प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो या मोसमातील पहिला संघ ठरला आहे. याउलट, पंजाब किंग्सला सहाव्या पराभवाचा धक्का बसल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान आता धोक्यात आले आहे.
विराट आणि व्यंकटेशचं वादळ
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची सुरुवात अडखळत झाली होती. सलामीवीर जेकब बेथेल अवघ्या 11 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी मोर्चा सांभाळला:
विराट कोहली: 37 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावांची अर्धशतकी खेळी.
देवदत्त पडिक्कल: 25 चेंडूंत 45 धावांचे उपयुक्त योगदान.
व्यंकटेश अय्यरचा झंझावात: विराट-पडिक्कल बाद झाल्यानंतर व्यंकटेशने पंजाबच्या गोलंदाजांची कंबर तोडली. त्याने अवघ्या 40 चेंडूंत 8 चौकार आणि 4 गगनभेदी षटकारांसह नाबाद 73 धावा ठोकल्या.
टिम डेव्हिडची खेळी: टिम डेव्हिडने 12 चेंडूंत 28 धावा कुटल्या, ज्यामुळे आरसीबीने 20 षटकांत 4 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला.
पंजाबचा कोलमडलेला टॉप-ऑर्डर आणि शशांकची झुंज
RCB ने उभ्या केलेल्या 223 धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अत्यंत लाजीरवाणी झाली. प्रियांश आर्या (0), प्रभसिमरन सिंग (2) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (1) हे तिघेही स्वस्तात तंबूत परतल्याने पंजाबची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती. मध्यंतरात कूपर कॉनोली (37) आणि सूर्यांश शेंडगे (35) यांनी डाव सावरला. त्यानंतर शशांक सिंगने आरसीबीच्या गोटात घबराट निर्माण केली. शशांक सिंगने अवघ्या 27 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावा केल्या. मार्कस स्टॉइनिसने देखील 37 धावांचे योगदान दिले, पण रसिक सलाम दारने शशांकला बाद करत पंजाबच्या विजयाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. पंजाबचा संघ 20 षटकांत 8 बाद 199 धावांपर्यंतच पोहोचू शकला.
हेही वाचा – IPL Schedule Update: इंधन बचतीसाठी IPL चं वेळापत्रक बदलणार? उर्वरित सामन्यांबाबत BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय
प्लेऑफचे गणित बदलले
आरसीबीच्या या विजयामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचल्याने आता उरलेल्या तीन जागांसाठी चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.