Rivaba Jadeja: भारतीय क्रिकेटमध्ये वाद आणि चर्चेचा विषय नेहमीच रंगतो. यावेळी लक्ष वेधलंय टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाची पत्नी आणि गुजरातच्या शिक्षणमंत्री रिवाबा जडेजांनी केलेल्या वक्तव्याने. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
कार्यक्रमात रिवाबा जडेजा आपल्या पतीच्या शिस्तबद्ध आयुष्याबद्दल बोलत होत्या. क्रिकेट खेळताना जडेजाला विविध देशांमध्ये जावे लागते. लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी त्याचे सामने होत असतात. मात्र, कितीही परदेशात मुक्काम असला तरी त्यांनी कोणतेही व्यसन किंवा चुकीची सवय लावलेली नाही, असे सांगताना रिवाबा यांनी टीम इंडियातील इतर खेळाडूंवर थेट बोट ठेवले.
हेही वाचा: ICC Rankings: विराट कोहलीची मोठी झेप! रोहित शर्मासाठी आता नवे आव्हान
“संघातील बऱ्याच खेळाडूंना चुकीच्या गोष्टींच्या सवयी आहेत. माझा पतीही तेच करू शकतो, पण तो करत नाही कारण त्याला आपली मर्यादा आणि जबाबदारी माहिती आहे,” असे रिवाबा म्हणाल्या. मात्र या ‘चुकीच्या गोष्टी’ नेमक्या कोणत्या, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. याच कारणामुळे त्यांच्या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
रिवाबा यांच्या या वक्तव्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय संघातील कोणत्या खेळाडूंबद्दल त्यांनी संकेत दिले? काय त्या कोणत्या विशिष्ट वादाबद्दल बोलत होत्या? की हा फक्त एक सर्वसाधारण उल्लेख होता? या सर्व मुद्द्यांवर सध्या सोशल मीडियावर चर्चा तापली आहे.
रिवाबा जडेजा यांची राजकीय ओळख बरीच मजबूत झाली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांना शिक्षणमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला आता अधिक राजकीय आणि सामाजिक वजन प्राप्त झाले आहे. यामुळेच त्यांच्या या भाषणाचा प्रभाव केवळ क्रिक्रेटपुरता मर्यादित न राहता व्यापक चर्चेचा विषय ठरला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किंवा टीममधील कोणत्याही वरिष्ठ खेळाडूकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु क्रिकेट क्षेत्रातील अनेक माजी खेळाडू आणि विश्लेषक या वक्तव्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींचे मत आहे की हे वक्तव्य अनवधानाने झाले असावे, तर काहींचे मत आहे की संघातील काही जुन्या वादांकडे अप्रत्यक्षपणे इशारा केला असावा.
दरम्यान, रवींद्र जडेजाही सध्या चर्चेत आहे. आयपीएल 2026 साठी त्याने आपला संघ बदलला असून तो आता राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जनंतर त्याची पुन्हा जुन्या फ्रेंचायझीकडे परतफेड हीही चर्चेचा मुद्दा ठरली आहे.
रिवाबा जडेजाच्या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी दिवसांत बोर्डाचे मत, खेळाडूंची प्रतिक्रिया आणि यासंबंधित आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.