Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा नेहमीच आपल्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानावर असो वा मैदानाबाहेर, रोहित सहसा संयमी आणि हसतमुख दिसतो. मात्र, अलीकडेच मुंबई विमानतळावर घडलेल्या एका घटनेमुळे रोहितचा संताप पाहायला मिळाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा नुकताच गुजरातमधील जामनगर येथे आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करून मुंबईत परतला होता. कुटुंबासोबत खासगी वेळ घालवून परतल्यानंतर विमानतळाबाहेर त्याची झलक पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे चाहत्यांची गर्दी झाली. क्रिकेटप्रेमींसाठी रोहित ही एक भावना असल्याने, त्याला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात.
Rohit Sharma got angry on his fans for misbehaving… ?? Rohit At the End : Daya, Jara Inko Garden Me Lekar Aao to, Vahi Khabar Leta Hu ? pic.twitter.com/cVvwAzuXFD — Jara (@JARA_Memer) January 4, 2026
विमानतळातून बाहेर पडल्यानंतर रोहित पत्नी रितिका आणि मुलांसह कारमधून निघाला होता. गर्दीत उभ्या असलेल्या चाहत्यांना पाहून त्याने कारची काच खाली करून हात हलवत अभिवादनही केलं. मात्र, याच क्षणी काही चाहत्यांनी मर्यादा ओलांडली. व्हायरल व्हिडीओनुसार, दोन तरुणांनी अचानक रोहितचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच क्षणी सेल्फी घेण्याचा अट्टहास केला.
हा प्रकार घडताच रोहितने तात्काळ आपला हात मागे घेतला आणि कारची काच वर केली. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून येत होती. कुटुंबासोबत असताना अशा प्रकारे वैयक्तिक अवकाशात हस्तक्षेप झाल्यामुळे रोहित संतापला असल्याचं व्हिडीओतून जाणवतं. ही घटना पाहून अनेक चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्या तरुणांच्या वागणुकीवर टीका केली आहे.
सेलिब्रिटी असले तरी त्यांनाही खासगी आयुष्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. काही चाहत्यांनी रोहितच्या संयमाचं कौतुक करत, तो आणखी कठोर प्रतिक्रिया देऊ शकला असता, असंही मत व्यक्त केलं.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर बोलायचं झालं तर रोहित शर्मा सध्या विश्रांतीच्या कालावधीत आहे. मात्र, तो लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघाच्या जर्सीत दिसणार आहे. 11 जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होत असून, रोहित या मालिकेत संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
याआधीच विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना रोहितने आपला फॉर्म दाखवून दिला होता. सिक्किमविरुद्ध त्याने शानदार 155 धावांची खेळी केली होती. जरी पुढील सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला असला, तरी त्याचा अनुभव आणि नेतृत्वगुण आगामी मालिकेत भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.