IND vs NZ ODI Team : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या संघात फलंदाज श्रेयस अय्यरचे पुनरागमन लक्षवेधी ठरले असून, निवड समितीने त्याच्यावर केवळ विश्वासच दाखवला नाही, तर त्याला थेट उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारीही सोपवली आहे. मात्र, ही महत्त्वाची भूमिका सांभाळण्यापूर्वी श्रेयसला बोर्डाच्या एका अत्यंत कडक अटीची पूर्तता करावी लागणार आहे, ज्याशिवाय त्याला मैदानात उतरता येणार नाही.
श्रेयसच्या दुखापतीचा इतिहास पाहता बीसीसीआयने हा सावध पवित्रा घेतला आहे. एका सामन्यादरम्यान त्याला इतकी गंभीर दुखापत झाली होती की, त्याला थेट मैदानाबाहेर नेण्याची वेळ आली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दीर्घकाळ लांब राहिला. अखेर 25 डिसेंबर रोजी तो पुनर्वसनासाठी बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (COE) मध्ये दाखल झाला आणि तिथून त्याच्या पुनरागमनाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली.
श्रेयसच्या तंदुरुस्तीत सकारात्मक सुधारणा
गेल्या काही दिवसांत श्रेयसच्या तंदुरुस्तीत मोठी आणि सकारात्मक सुधारणा दिसून आली आहे. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाशी संबंधित 4 अत्यंत कठीण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, 2 जानेवारीला झालेल्या सराव सत्रातही त्याने चोख कामगिरी केली. आता 5 जानेवारीला त्याच्या काही अंतिम सत्रांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत, ज्यामध्ये प्रत्यक्ष सामन्यासारखी परिस्थिती निर्माण करून त्याच्या शरीराची क्षमता पुन्हा एकदा तपासली जाईल.
श्रेयस अय्यरच्या फिटनेस चाचणीचा अंतिम निकाल काय लागतो आणि यानंतर तो उपकर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.
चाचणीत अपयशी ठरला, तर..
बीसीसीआयने श्रेयसबाबत घातलेली मुख्य अट म्हणजे 'अधिकृत फिटनेस क्लिअरन्स'. बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'च्या (COE) तज्ज्ञांकडून जोपर्यंत त्याला पूर्णपणे फिट घोषित केले जात नाही, तोपर्यंत त्याला या मालिकेत खेळण्याची परवानगी मिळणार नाही. उपकर्णधारपदाचा मान मिळवण्यासाठी त्याला या अटीचे पालन करणे अनिवार्य आहे. जर तो या चाचणीत अपयशी ठरला, तर त्याला संघात असूनही केवळ प्रेक्षक म्हणून राहावे लागेल.
सध्याच्या चिन्हांनुसार श्रेयस अय्यरला त्याच्या रिहॅबिलीटेशन कार्यक्रमात कोणतीही मोठी अडचण जाणवलेली नाही. उर्वरित काही चाचण्या यशस्वी झाल्यास त्याला विजय हजारे करंडकातही खेळण्याची मुभा मिळू शकते. श्रेयस या आव्हानात्मक परिस्थितीतून तावून-सुलाखून निघाल्यास तो उपकर्णधार म्हणून भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध नवे बळ देईल, अशी आशा निवड समितीला आणि चाहत्यांना आहे.