Shreyas Iyer Health Update: टीम इंडियाचा विश्वसनीय फलंदाज श्रेयस अय्यर सध्या गंभीर दुखापतीनंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याच्या पोटावर बॉल लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला हलकी दुखापत असल्याचं वाटलं होतं, पण तपासणीत त्याच्या स्प्लीनमध्ये (spleen) जखम झाल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला ICU मध्ये हलवण्यात आलं होतं.
अनेक चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा व्यक्त केल्या. शेवटी श्रेयस अय्यरने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना हेल्थ अपडेट दिलं. त्याने लिहिलं 'सरणाऱ्या प्रत्येक दिवसांनंतर मी स्वतःला थोडं अधिक मजबूत वाटतोय. सध्या रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माझी तब्येत हळूहळू सुधारते आहे. मला मिळालेल्या सर्व प्रेम, शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभार.'
हेही वाचा: IND vs AUS 1st T20: भारत-ऑस्ट्रेलिया पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द; आता मेलबर्नमध्ये भिडणार संघ
त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये 'गेट वेल सून'चा वर्षाव केला. त्याच वेळी टीम इंडियाचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की गेल्या काही दिवसांत श्रेयसशी त्याचा संपर्क झाला आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) अधिकृत निवेदन जारी करत सांगितलं की, श्रेयस अय्यर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे आणि त्याची तब्येत हळूहळू सुधारत आहे. 28 ऑक्टोबर रोजी केलेल्या वैद्यकीय तपासणीत सकारात्मक बदल दिसून आला आहे. बोर्डने चाहत्यांना शांत राहण्याचं आवाहन करत सांगितलं की श्रेयस पूर्ण बरा झाल्यानंतरच मैदानात परतणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयसला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी किमान दोन महिने लागतील. त्यामुळे तो जानेवारी 2026 पूर्वी कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. तोपर्यंत त्याला सिडनीमध्येच ठेवण्यात येणार असून, भारतीय वैद्यकीय तज्ज्ञ त्याच्याशी सातत्याने संपर्कात आहेत.
हेही वाचा: Rohit Sharma: हिटमॅनचा धमाका! रोहित शर्मा जगात नंबर 1; सचिन, धोनी आणि विराटला मागे टाकत रचला नवा इतिहास
श्रेयस अय्यरने गेल्या काही वर्षांत भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या बॅटिंगमुळे भारताने अनेक वेळा निर्णायक विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्याची गैरहजेरी संघासाठी मोठी चिंता निर्माण करतेय. मात्र त्याची सकारात्मक वृत्ती आणि चाहत्यांचा पाठिंबा पाहता तो लवकरच मैदानात परत येईल, अशी सर्वांना आशा आहे.
श्रेयसची पोस्ट पाहिल्यानंतर एकच गोष्ट स्पष्ट झाली; तो हार मानणाऱ्यांपैकी नाही. प्रत्येक दिवस त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा देतोय आणि चाहत्यांसाठी हा नक्कीच एक दिलासादायक सिग्नल आहे.