Monday, November 17, 2025 05:52:00 AM

Shubman Gill: रोहितच्या जागी गिल, पण त्याच्या इच्छेविरुद्ध? भारतीय क्रिकेटमध्ये नवा वाद सुरू

अनुभवी रोहित शर्माकडून भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे

shubman gill रोहितच्या जागी गिल पण त्याच्या इच्छेविरुद्ध भारतीय क्रिकेटमध्ये  नवा वाद सुरू

Shubman Gill: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बदलाची नवी लाट आली आहे. अनुभवी रोहित शर्माकडून भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व काढून तरुण शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. परंतु, या निर्णयाने क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. काहींच्या मते गिलवर ही जबाबदारी सोपवली नाही, तर 'लादण्यात' आली आहे.

गिल सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असलेल्या नावांपैकी एक आहे. त्याच्याकडे आधीच कसोटी संघाचे नेतृत्व आणि टी-20 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. आता त्याच्यावर वनडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. परंतु, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांना या घडामोडींवर आक्षेप आहे. त्यांचे मत आहे की शुभमन गिलला एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्या दिल्यामुळे त्याच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: IND vs AUS : टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ जाहीर; मिशेल मार्शकडे कांगारूंच्या कर्णधार पदाची जबाबदारी

कैफ यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रतिक्रिया देताना म्हटले, 'गिलवर जबरदस्तीने कर्णधारपद लादण्यात आले आहे. कोणताही खेळाडू कधीही स्वतःहून कर्णधारपद मागत नाही. निवड समितीने त्याच्यावर खूप लवकर आणि जास्त भार टाकला आहे. हे त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'रोहित शर्मा अजून काही वर्षे संघाचे नेतृत्व करू शकला असता. 2027 च्या विश्वचषकानंतर हा बदल करायला हवा होता. सध्या गिलवर खूप अपेक्षांचा आणि जबाबदाऱ्यांचा ताण टाकला जात आहे. तो कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, तिथेच आता तो एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणार आहे.'

गिलने अल्पावधीतच आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, परंतु नेतृत्व ही फक्त प्रतिभेची परीक्षा नसते, तर मानसिक स्थैर्याचीही असते. गिल सध्या संघातील सर्वात तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंमध्ये मोडतो. मात्र, त्याच्यावर सततच्या जबाबदाऱ्यांचा भार वाढत चालला आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत तरुण खेळाडूंच्या करिअरवर मानसिक आणि शारीरिक दबाव निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा: World Para Athletics Championships 2025: भारताची 6 सुवर्ण, 9 रौप्य तर 7 कांस्य पदकांची कमाई; 22 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी

दुसरीकडे, काहींचे मत आहे की बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी हा निर्णय भविष्याचा विचार करून घेतला आहे. 2027 च्या विश्वचषकापर्यंत गिलला पूर्ण अनुभव आणि नेतृत्व कौशल्य मिळावे, म्हणून ही जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. परंतु, गिलच्या संमतीशिवाय किंवा तयारीशिवाय हा निर्णय घेतला गेला असेल, तर त्याचा परिणाम त्याच्या एकूण कामगिरीवर आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो.

भारतीय क्रिकेटमध्ये आधीही अशा जबाबदाऱ्या अचानक बदलल्या गेल्या आहेत, पण शुभमन गिलच्या बाबतीत हा निर्णय खूप वेगाने घेतल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे. पुढील काळात गिल या दबावाला तोंड देऊन संघाला किती यश मिळवून देतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री