Rajasthan Royals Acquisition: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात एक ऐतिहासिक व्यवहार झाला असून, पोलाद उद्योगातील जागतिक दिग्गज लक्ष्मी मित्तल आता 'राजस्थान रॉयल्स'चे नवे मालक बनले आहेत. ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल यांनी जयपूरस्थित या फ्रँचायझीच्या अधिग्रहणाची अधिकृत घोषणा केली आहे. या व्यवहाराचे एकूण मूल्य अंदाजे 1.65 अब्ज डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 15,660 कोटी इतके प्रचंड आहे. या करारामुळे क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
मित्तल कुटुंबाकडे 75 टक्के हिस्सा
Cricbuzz च्या अहवालानुसार, या अधिग्रहणासाठी तयार करण्यात आलेल्या कन्सोर्टियममध्ये लक्ष्मी मित्तल यांच्यासह सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला आणि विद्यमान मालक मनोज बदाले यांचा समावेश आहे. या कराराच्या अटींनुसार, संघाचा सुमारे 75 टक्के हिस्सा (Stake) स्वतःकडे ठेवणार असून, त्यांच्याकडेच मुख्य सूत्रे असतील. तसेच आदर पूनावाला त्यांच्याकडे 18 टक्के हिस्सा असेल. याशिवाय, मनोज बदाले व इतरांकडे उर्वरित 7 टक्के हिस्सा सध्याच्या गुंतवणूकदारांकडे राहील. विशेष म्हणजे, मनोज बदाले हे संघाशी जोडलेले राहतील आणि आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर फ्रँचायझीला पुढील काळातही मार्गदर्शन करतील.
ग्लोबल रॉयल्सचेही नियंत्रण; मंजुरीची प्रतीक्षा
या मोठ्या व्यवहारामध्ये केवळ भारतीय आयपीएल संघाचाच समावेश नाही, तर दक्षिण आफ्रिकेतील 'पार्ल रॉयल्स' आणि कॅरिबियनमधील 'बार्बाडोस रॉयल्स' या आंतरराष्ट्रीय फ्रँचायझींची मालकीही मित्तल समूहाकडे जाणार आहे. मात्र, या व्यवहाराला अद्याप BCCI, CCI आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. ही कायदेशीर प्रक्रिया 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत (Third Quarter) पूर्ण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचीच निवड करण्यामागे लक्ष्मी मित्तल यांचे एक विशेष भावनिक कारण आहे. मित्तल यांचा जन्म राजस्थानमधील सादुलपूर या छोट्या गावात झाला होता. आपल्या निवेदनात ते म्हणाले, "माझे कुटुंब मूळचे राजस्थानचे असल्याने, या राज्याच्या संघाशी जोडले जाणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शालेय जीवनापासून मी क्रिकेटचा चाहता राहिलो आहे. ज्या संघाने अनेक दिग्गज खेळाडू घडवले आणि युवा प्रतिभेला संधी दिली, त्या 'रॉयल्स' कुटुंबाचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे."
मैदानातही रॉयल्सची दमदार कामगिरी
एकीकडे मालकी हक्काचे मोठे बदल होत असताना, दुसरीकडे आयपीएल 2026 च्या मैदानातही राजस्थान रॉयल्सचा संघ विजयाची मोहीम फत्ते करत आहे. युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर संघ सध्या प्ले-ऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 2008 मध्ये पहिले आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाला आता मित्तल यांच्या रूपात मिळालेले खंबीर नेतृत्व आणि भरीव आर्थिक बळ यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल, अशी अपेक्षा क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.