आयपीएलच्या 39 व्या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाचा फडशा पाडला. सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा दिल्लीच्या आठ धावा झाल्या आणि तब्बल सहा खेळाडू बाद झाले होते. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांच्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दिल्लीच्या 9 फलंदाजांनी 10 धावांचा आकडादेखील पार केला नाही. दिल्लीने कसाबसा 75 धावा केल्या. 75 ही आयपीएलमधील बारावी सगळ्यांत कमी सांघिक धावसंख्या होती. पण तुम्हाला आयपीएलमधील ५ सर्वात कमी सांघिक धावसंख्या माहीत आहेत का ? जाणून घेऊया याबद्दल.
1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (49)
आयपीएलचा 'Lowest Score' RCB च्या नावावर आहे, हे जवळपास सर्वांनाच माहीत असेल. 2017 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने RCB ला 49 धावांमध्ये सर्वात केलं होतं. विराट कोहली, ख्रिस गेलं आणि एबी डिव्हिलिअर्स संघात असूनदेखील आरसीबी 50 चा आकडा पार करू शकले नाहीत. कोलकाताचा नॅथन कुल्टर-नाईल या सामन्याचा सामनावीर होता. त्याने एकवीस धावत तीन खेळाडू बाद केलेले. विराट कोहली, एबी डिव्हिलिअर्स आणि केदार जाधव यांच्या विकेट्स त्याने घेतलेल्या. हा आयपीएलच्या इतिहासातील एक लाजिरवाणा पराभव म्हणून ओळखला जातो.
2. राजस्थान रॉयल्स (58)
आयपीएल 2009 च्या हंगामात आरसीबीने राजस्थानचा डाव 58 धवांत संपवलेला. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये झाला होता. राजस्थानसमोर 134 धावांचे लक्ष्य होते. पण आरसीबीच्या घातक गोलंदाजीने राजस्थानचा फडशा पाडला. अनिल कुंबळे याने 5 धावत पाच खेळाडू बाद केले. प्रवीण कुमार आणि जेस्सी रायडर यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले होते. विशेष म्हणजे 5 धावांत 5 खेळाडू बाद करूनही अनिल कुंबळे या सामन्याचा सामनावीर नव्हता. राहुल द्रविड याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. राहुल द्रविड याने या सामन्यात 66 धावांची खेळी केली होती, ज्या राजस्थनच्या धावसंख्येपेक्षा 8 धावा जास्त होत्या.
3. राजस्थान रॉयल्स (59)
तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात 'Lowest Score' देखील राजस्थानच्या नावावर आहे. आरसीबीने 2009 चीच पुनरावृत्ती केली असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. 172 धावांचे लक्ष राजस्थनच्या समोर होतं, पण राजस्थान त्या आकड्याच्या जवळदेखील पोहोचू शकला नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजीचं खेळणं बनवलं. वेन पार्नेलने तीन, कर्ण शर्मा आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2-2, तर सिराज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. वेन पार्नेल या सामन्याचा सामनावीर ठरला त्याने 10 धावा देऊन 3 खेळाडू बाद केले. जोस बटलर, जो रूट आणि संजू सॅमसनला त्याने बाद केले.
4. दिल्ली डेअरडेव्हिल्स (66)
2017 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या संघासमोर 213 धावांचं लक्ष ठेवलेलं आणि दिल्लीला 66 धावांवर बाद करून एक लाजिरवाणा पराभव दिल्लीचा केला. मुंबईकडून कर्ण शर्मा आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी 3-3 तर लसिथ मलिंगा याने 2 तर मिचेल मॅकक्लेनघन
आणि जसप्रीत बुमराह यांने प्रत्येकी 1-1 खेळाडू बाद केला. या सामन्याचा सामनावीर गोलंदाज नसून फलंदाज होता. लेंडल सिमन्स या सामन्याचा सामनावीर होता. त्याने 66 धावांची खेळी केली होती.
5. दिल्ली डेअरडेव्हिल्स (67)
'Lowest Score' च्या यादीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नाव पाचव्या क्रमांकावरदेखील आहे. 2017 च्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्लीला 67 धावांमध्ये ऑलआऊट केले होते. पंजाबचा संदीप शर्मा या सामन्याचा सामनावीर होता. त्याने 20 धावांमध्ये 4 खेळाडू बाद केले होते. त्याने संजू सॅमसन, सॅम बिलिंग्स, श्रेयस अय्यर आणि कागिसो रबाडा यांना बाद केले होते. 68 धावांचे लक्ष पंजाबने आठ ओव्हर्सच्या आत पूर्ण केलं.