Monday, May 11, 2026 11:35:01 AM

IND vs PAK: भारत-पाकिस्तान मैदानात पुन्हा भिडणार का? क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं धोरण

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 6 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी करून या दोन्ही देशांमधील खेळांबाबतचे आपले अधिकृत धोरण स्पष्ट केले आहे.

ind vs pak भारत-पाकिस्तान मैदानात पुन्हा भिडणार का क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं धोरण

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा सामन्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेवर केंद्र सरकारने पडदा टाकला आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 6 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी करून या दोन्ही देशांमधील खेळांबाबतचे आपले अधिकृत धोरण स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम भविष्यातील क्रिकेट मालिका आणि इतर क्रीडा स्पर्धांवर होणार आहे.

द्विपक्षीय मालिकांवरील बंदी कायम
क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय (Bilateral) क्रीडा व्यवहारांवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंदी अद्यापही लागू आहे. 'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'भारतीय संघ कोणत्याही द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. त्याचप्रमाणे, पाकिस्तानच्या संघांनाही भारतात खेळण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. सीमेपलीकडील तणाव आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकारने हे कडक पाऊल उचलले आहे.'

बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अडथळा नाही
द्विपक्षीय मालिकांवर बंदी असली तरी, क्रीडा चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मंत्रालयाने नमूद केले की, आयसीसी (ICC) किंवा आशिया चषक यांसारख्या बहुराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणे सुरूच ठेवतील. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच, भारताने आयोजित केलेल्या अशा मोठ्या जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू आणि संघांना भारतात येण्याची परवानगी दिली जाईल.

वाद आणि दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) झालेल्या आशिया चषकादरम्यान भारत-पाकिस्तान सामन्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये 26 लोकांचा बळी गेला होता, सरकारने हे कठोर धोरण आखले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील क्रीडा संबंध केवळ मोठ्या जागतिक मंचापुरतेच मर्यादित राहिले आहेत.'

हेही वाचा - IPL Final Venue : 'या' मैदानावरवर पुन्हा रंगणार महासंग्राम; IPL 2026 च्या प्ले ऑफ अन् फायनलचं ठिकाण ठरलं

जागतिक स्पर्धांच्या यजमानपदाचे लक्ष्य
सरकारने आपल्या निवेदनात भविष्यातील मोठ्या योजनांचाही पुनरुच्चार केला आहे. भारत सध्या 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) आणि 2036 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे. या स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जाईल, असे सरकारने ठामपणे सांगितले आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे तूर्तास तरी भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता मावळली असली, तरी जागतिक स्पर्धांमधील 'हाय-व्होल्टेज' सामने मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या