मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रियेवरून देशात राजकीय वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि इतर संबंधित नागरी सेवांमधील तब्बल 124 माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत देशातील नागरिकांना एक अत्यंत महत्त्वाचे खुले पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोग आणि ‘SIR’ प्रक्रियेचे जोरदार समर्थन केले असून, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय निवडणूक प्रक्रियेवर आणि घटनात्मक संस्थांवर अनियमिततेचे आरोप करण्याच्या प्रवृत्तीवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
‘बूथ कॅप्चरिंग’चा काळ भूतकाळात जमा; सध्याची प्रणाली सुरक्षित
माजी सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पूर्वीच्या काळात निवडणुकांदरम्यान होणारे ‘बूथ कॅप्चरिंग’ (मतदान केंद्र बळकावणे), मतपेट्यांमध्ये बोगस मते भरणे आणि मतदान केंद्रांवर होणारा हिंसाचार हा काळ आता पूर्णपणे भूतकाळात जमा झाला आहे. सध्याची भारतीय निवडणूक प्रणाली अत्यंत पारदर्शक आणि बहु-स्तरीय सुरक्षा उपायांनी सज्ज आहे. यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींची उपस्थिती, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे (EVMs) त्रिस्तरीय सीलिंग, व्हीव्हीपीएटी (VVPAT) पडताळणी आणि 24 तास ‘स्ट्रॉन्ग रूम्स’ची सुरक्षा यांसारख्या कठोर नियमावलीचा समावेश आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
बिहार निवडणुकीचे उदाहरण आणि निवडणूक निकालांचा संदर्भ
आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा विशेष उल्लेख केला. या निवडणुकीत एकाही मतदान केंद्रावर फेरमतदान (Re-polling) घेण्याची वेळ आली नाही आणि 1951 नंतरच्या इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. पत्रात कडक शब्दांत नमूद करण्यात आले आहे की, “निवडणूक जिंकल्यावर तीच प्रणाली प्रामाणिक वाटणे आणि पराभव झाल्यावर त्यात फेरफार झाल्याचा आरोप करणे, ही दुटप्पी भूमिका योग्य नाही.” याच निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली सत्ताधारी भाजपला अनेक राज्यांत पराभव पत्करावा लागला, तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या बळावर पूर्ण बहुमत मिळाले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा – ‘जिथे अडवतील तिथेच जंतरमंतर उभं करा…’; मोदी सरकारवर हल्लाबोल करत अजिंक्य शिंदेंचे देशवासीयांना मोठं आवाहन
माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रावर स्वाक्षरी
नागरिकांना लिहिलेल्या या उघड पत्रावर देशातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केलेल्या 124 माजी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये माजी परराष्ट्र सचिव कंवल सिबल, माजी आयएएस अधिकारी आर. डी. कपूर, समिरेद्र चॅटर्जी, गोपाल कृष्ण, विवेक भारद्वाज आणि नवनीत सहगल यांच्यासह अनेक सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लोकशाही आणि घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता जपण्यासाठी पुराव्यांशिवाय आरोप करणे थांबवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.