प्रमोद पानबुडे, प्रतिनिधी
वर्धा : मध्यरात्री कुख्यात दारू विक्रेता गजानन पाटणकर याची चाकूने पोटावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. देवळीतील इंदिरानगर परिसरात चार ते पाच युवकांनी मिळून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मागील आठवड्यापासून गजानन पाटणकर आणि आरोपी युवकांमध्ये वाद सुरू होता. घटनेच्या काही तास आधीही दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. त्यानंतर पाटणकर पुन्हा आरोपींच्या परिसरात पोहोचला. तिथे पुन्हा वादाची ठिणगी पडली आणि वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले. चार ते पाच युवकांनी चाकूने वार करीत पाटणकर याची हत्या केली. घटनेचे गांभीर्य ओळखून देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी चार ते पाच संशयित युवकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येमागील नेमके कारण आणि पूर्ववैमनस्याचा तपास आता पोलीस करत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर