Lalbaugcha Raja Donation Collection: मुंबईतील जगप्रसिद्ध ‘लालबागच्या राजा’च्या 93 व्या गणेशोत्सव सोहळ्यात यंदाही देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने राजाचे दर्शन घेतले. 14 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात भक्तांनी राजाच्या चरणी तब्बल 6 कोटी 11 लाख 96 हजार 500 रुपयांचे भरभरून दान अर्पण केले आहे. मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, यामध्ये स्टेजजवळील पेटीत 3 कोटी 53 लाख 42 हजार रुपये, रंग पेटीत 2 कोटी 42 लाख 40 हजार रुपये आणि विसर्जन पेटीत 16 लाख 14 हजार 500 रुपये जमा झाले आहेत.
30 सप्टेंबरला वस्तूंचा जाहीर लिलाव
गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या विविध मौल्यवान भेटवस्तूंचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, 30 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत लालबाग मार्केटच्या आवारात हा भव्य लिलाव पार पडेल. या लिलाव प्रक्रियेमध्ये भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे सुबक दागिने, अनेक कलाकृती तसेच भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या 2 नवीन मोटारसायकल लिलावासाठी ठेवल्या जाणार आहेत.
हेही वाचा – बेबी फूडच्या पॅकेजिंगवर कडक नियम; तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, आईच्या दुधाला…
सर्व गणेशभक्तांना लिलावात सहभागी होता येणार
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी या लिलावाबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या लिलाव प्रक्रियेत सर्वसामान्य गणेशभक्तांना थेट सहभागी होऊन राजाचा प्रसाद म्हणून वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर आता लालबाग मार्केटमध्ये होणाऱ्या या जाहीर लिलावाबाबत भक्तांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.