गणेशोत्सवात डीजेबंदीनंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चक्क दिवाळीआधीच फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य सरकारी आदेशानुसार फटाकेबंदीचे नियम असे:
1. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि चौकांमध्ये फटाके, रॉकेट किंवा इतर आतषबाजी करण्यास पूर्णपणे बंदी आहे.
2. हा आदेश 6 ऑक्टोबर 2026 च्या मध्यरात्रीपासून ते 4 डिसेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
3. रस्त्यांवरील मिरवणुकांमध्ये लेझर लाईट्स आणि हाय-इंटेन्सिटी सर्चलाईट बीम्स वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
यापूर्वी नवरात्रीत गरबा-दांडियाबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती, ज्यात वेळेची विशिष्ट मर्यादा घालून देण्यात आली होती. आता फटाकेबंदीबाबतही कडक नियमावली जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.