‘नॅचरल डेअरी’वर FDA ची मोठी कारवाई! तपासणीत गंभीर नियमभंग उघड; परवाना तात्काळ निलंबित

वैजापूरच्या नॅचरल डेअरीवर FDA ने कारवाई करत अन्न परवाना निलंबित केला

‘नॅचरल डेअरी’वर FDA ची मोठी कारवाई! तपासणीत गंभीर नियमभंग उघड; परवाना तात्काळ निलंबित

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर शहरातील यशवंत कॉलनी, रामगिरी नगर परिसरात असलेल्या ‘नॅचरल डेअरी’वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. डेअरीच्या अचानक तपासणीत स्वच्छतेसह अन्न सुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन आढळून आल्याने प्रशासनाने डेअरीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला. याशिवाय डेअरीतील पनीर, क्रीम आणि तुपाचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.

तपासणीत अनेक त्रुटी उघड

2 ऑक्टोबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या पथकाने नॅचरल डेअरीची तपासणी केली. यावेळी डेअरीचा उत्पादन परिसर अत्यंत अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले. FSSAI च्या निकषांनुसार करण्यात आलेल्या तपासणीत 94 पैकी केवळ 15 गुण मिळाले. त्यामुळे डेअरी ‘नॉन-कॉम्प्लायन्स’ असल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीदरम्यान दूध हाताळणीची प्राथमिक तपासणी, भेसळ तपासणीच्या नोंदी आणि पिण्यायोग्य पाण्याच्या तपासणीचा अहवाल यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच दूध साठवताना आवश्यक तापमान नियंत्रण आणि कीटक नियंत्रणाच्या प्रक्रियेतही नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले.

कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष

डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अन्न हाताळणीसाठी आवश्यक ॲप्रन, ग्लोव्हज आणि हेडगेअर नसल्याचे तपासणीत आढळले. दूध साठवण्यासाठी नियमबाह्य प्लॅस्टिक कॅनचा वापर केला जात असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. यासोबतच सांडपाणी व्यवस्थापनासाठी असलेली ETP यंत्रणाही कार्यरत नसल्याचे समोर आले.

42 हजार 880 रुपयांचा साठा नष्ट

या कारवाईत प्रशासनाने डेअरीमधील 59 किलो पनीर, 11 किलो क्रीम आणि 28 किलो तूप असा एकूण 42 हजार 880 रुपये किमतीचा साठा जप्त केला. हा साठा नंतर नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडून तपासणीची मोहीम सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number