रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नगरसूल ते तारुण या दरम्यान दुहेरीकरण, विद्युतीकरण तसेच सिग्नल यंत्रणेचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्यासाठी 25 नोव्हेंबर ते थेट 10 डिसेंबरपर्यंत असे तब्बल 10 दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
4 पॅसेंजर गाड्या रद्द; 12 गाड्यांचे मार्ग बदलणार?
मिळालेल्या माहितीनुसार, या ब्लॉकचा थेट फटका हा छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातून धावणाऱ्या गाड्यांना बसणार आहे. याच कालावधीमध्ये 4 पॅसेजर ट्रेन या पूर्णपणे बंद राहणार आहेत. ज्यामध्ये जालना-नगरसूल पॅसेंजर (77619, 77620) आणि डेमू गाड्या (77621, 77622) यांचा समावेश असणार आहे. या गाड्यांच्या 1 ते 10 डिसेंबर या दरम्यान पाच-पाच असा फेऱ्या रद्द केल्या असून 12 लांब पल्ल्याच्या गाड्या या अर्ध्या मार्गावरच धावणार आहेत.
चेन्नई-नगरसूल, नरसापूर-नगरसूल, काचीगुडा-नगरसूल, मनमाड-धर्माबाद तसेच मनमाड-नांदेड या गाड्या फक्त रोटेगाव किंवा लासूर स्थानकापर्यंत धावतील. पुढचा प्रवास हा रद्द असेल. शिवाय 3 एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावतील, अशी माहिती समोर आलेली आहे.
नांदेड-निजामुद्दीनसह 3 एक्स्प्रेस गाड्यांना उशीर
नांदेड-निजामुद्दीन ही एक्स्प्रेस 80 मिनिटे, तर नांदेड-अमृतसर तसेच नांदेड-एसएमव्हीटी बेंगळुरु या गाड्या 70 मिनिटे उशिराने धावणार आहे. संबंधित कामे पूर्ण होताच वाहतूक वेगवान होणार असली तरी ही प्रवाशांचे मोठे हाल होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सणासुदीच्या काळात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी बसचा आधार घ्यावा लागेल आणि तिकीट दर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update