मुंबई : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना एसटीच्या खिडकीवरची ती मोठी रांग आठवत आहे का?ऑफिसला जायचंय, पण किमान अर्धा तास तरी रांगेत उभं राहून तिकीट काढा, मगच बस पकडा. आता या कटकटीला कायमचा पूर्णविराम मिळणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी एसटी बुकिंगची नवी सुविधा खरं तर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ही सोय नेमकी कोणी सुरु केली आहे आणि त्याचा वापर कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर.
ST प्रवाशांनो ही माहिती चुकवू नका
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते दादर या मार्गावर धावणाऱ्या प्रसिद्ध शिवनेरी बसंच तिकीट आता थेट प्रवाशांच्या व्हॉट्सॲप या एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप वर मिळणार आहे. बसस्थानकावर जाण्याची किंवा वेबसाईटवर डोके खाजवण्याची गरज आता भासणार नाही. 24 सप्टेंबरपासून ही नवी सुविधा प्रायोगित तत्त्वावर सुरु झालेली आहे. महाराष्ट्राची सर्वात आरामदायी तसेच प्रतिष्ठित सेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवनेरीला रोज हजारो प्रवासी पसंती देत असतात. हाच प्रतिसाद वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
‘हा’ नंबर कसा उपयोगी ठरणार?
तिकीट काढण्यासाठी फक्त प्रवाशांना ‘8097030022’ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन घेयचा आहे. त्यानंतर व्हॉट्सॲपवर जाऊन या नंबरवर फक्त ‘Hi’ असा एक मेसेज पाठवा. तुमचा मेसेज पाठवताच एक ऑटोमॅटिक मेनू येईल. त्यात तुम्हाला प्रवासाची तारीख,वेळ तसेच जागा निवडण्याचा एक पर्याय मिळेल. जागा सिलेक्ट केली की पेमेंटची लिंक येईल.
पैसे भरल्यास तिकीट थेट तुमच्या व्हॉट्सॲपव नंबरवरच येईल. पुणे-दादर अशा शिवनेरीच्या एसी बसचं तिकीट 590 रुपये आहे. सध्या ही सेवा फक्त पुणे-दादर मार्गासाठी सुरु केलेली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळत आहे हे पाहूनच हीच सुविधा इतर मार्गांवरही सुरु करण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. त्यामुळेच पुढच्या वेळी पुणे-मुंबई जर प्रवास करायचा असल्यास रांगेत उभं न राहता, तुम्ही घरी बसल्या तिकीट काढू शकता.