नवी दिल्ली: विदेशात भारतीय लोकांवरील हल्ले वाढले आहेत. अमेरिकेत कुटुंबियांसमोर भारतीय नागरिकाची हत्या करण्यात आली. आता अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही भारतीय लोक सुरक्षित नसल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर बलात्कार झाल्याची घटना होती. त्यातच आता अजून एक धक्कादायक प्रकार पुढे आला. उत्तर इंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर अगोदर हल्ला करून शिव्या देण्यात आल्या आणि त्यानंतर बलात्कार केला. याबाबतची माहिती ब्रिटिश पोलिसांनी दिली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. त्यामध्ये आरोपी दिसत आहे. संबंधित व्यक्तीबद्दल अधिक माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे. सध्या पोलिसांकडून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी वॉल्सॉलच्या पार्क हॉल परिसरातून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर घटनेची सर्व माहिती पोलिसांना मिळाली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी संशयिताचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज जारी केले आहेत आणि या संबंधित व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने हा सर्वात भयंकर हल्ला असल्याचे सांगितले.
हेही वाचा: South China Sea Crash: अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली; पायलट-क्रू सुरक्षित, तपास सुरू
आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असून लवकरात लवकर त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही आरोपीविरोधात पुरावे गोळा करत असून एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले. हल्लेखोराची प्रोफाइल सध्या तयार केली जात आहे, जेणेकरून त्याला ताब्यात घेता येईल. पण, या घटनेने चांगलीच मोठी खळबळ उडाली आहे.
महिलेवर हल्ला करणारा व्यक्ती साधारणपणे 30 वर्षाचा असल्याचा अंदाज आहे. शीख फेडरेशन यूके आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, वॉल्सॉलमध्ये ज्या तरुणीवर हल्ला झाला ती एक पंजाबी महिला होती. हल्लेखोराने ती राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला असे दिसून येते.