इस्लामाबाद: पाकिस्तानमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सना अवघ्या 17 वर्षांची होती. इस्लामाबादमध्ये सनाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सनावर गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. सना युसूफला दोन गोळ्या लागताच तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर, सनाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी 'पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' येथे नेण्यात आला आहे.
सनाची हत्या कोणी केली?
वृत्तानुसार, हत्येमागील कारणे अद्याप कळलेली नाहीत, परंतु सोशल मीडियावर सनाच्या लोकप्रियतेशी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पैलूंचाही तपास केला जात आहे. सना युसूफ टिकटॉकवर तिच्या डान्स आणि लिप-सिंक व्हिडिओंसाठी ओळखली जात होती. तिचे हजारो फॉलोअर्स होते. तिच्या मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - सुनिता जामगडे गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात; दोन तासांत एलओसी पार केल्याचं समोर
पाकिस्तान पोलिसांनी म्हटलं आहे की, ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. सनाच्या हत्येमागील संभाव्य कारणे - जसे की वैयक्तिक शत्रुत्व, सायबर क्राईम किंवा इतर सामाजिक कारणे आदी दृष्टीकोनातून चौकशी करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी सनासाठी न्यायाची मागणी करत #JusticeForSanaYousaf ट्रेंड करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - 'पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही...'; असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा
दरम्यान, मृत्यूच्या काही तास आधी सनाने आपल्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर लगेचच तिच्या हत्येची बातमी आली आहे. आता चाहते सना युसूफच्या शेवटच्या व्हिडिओवर दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी पाकिस्तानला असुरक्षित देश म्हटलं आहे.