Sunday, June 15, 2025 12:38:58 PM

'पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही...'; असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा

गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे.

पाकिस्तान मूलभूत हक्कांशी तडजोड करणार नाही असीम मुनीर यांचा सिंधू करारावरून भारताला इशारा
Asim Munir
Edited Image

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली. तसेच भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. या मुद्द्यावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारताविरुद्ध विधान केले असून पाकिस्तान पाण्याच्या हक्कांवर कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असा इशारा दिला आहे. 

आम्ही कधीही भारतीय वर्चस्व स्वीकारणार नाही- 

दरम्यान, गुरुवारी विविध विद्यापीठांच्या कुलगुरू, प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले की, हा 24 कोटी पाकिस्तानी लोकांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न आहे. पाकिस्तान कोणत्याही किंमतीत यावर तडजोड करणार नाही. आम्ही कधीही भारतीय वर्चस्व स्वीकारणार नाही.

भारत बलुचिस्तानमध्ये दहशतवादाला पाठिंबा देत आहे, असा आरोपही मुनीर यांनी केला आहे. मुनीर यांच्या मते, भारत पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी बलुच बंडखोरांना प्रोत्साहन देत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलीकडेच काश्मीर, दहशतवाद, पाणी आणि व्यापार यासारख्या प्रलंबित मुद्द्यांवर भारतासोबत शांतता चर्चेची इच्छा व्यक्त केली. भारताने यावर स्पष्ट उत्तर दिले आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला; BLA चा दावा

चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाही - 

तथापि, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा शक्य नाही. भारताची पाकिस्तानशी चर्चा फक्त दोन मुद्द्यांवर केंद्रित असेल - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताला सोपवणे आणि दहशतवादावर ठोस कारवाई करणे. 

हेही वाचा - 'भारतात हिंदू-मुस्लिम दंगली घडवण्याचे दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे'; ओवैसींकडून रियाधमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश

पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही - 

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी कराराबद्दल बोलताना म्हटलं होतं की, दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत, दहशतवाद आणि व्यापार एकत्र जाऊ शकत नाहीत आणि पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी करार स्थगित राहिलं असं म्हटलं होतं.  
 


सम्बन्धित सामग्री