PM Modi Donald Trump Call: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचला असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला. इराण-अमेरिका संघर्ष सुरू झाल्यापासून या दोन जागतिक नेत्यांमधील हा पहिलाच संवाद आहे. पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली करण्याबाबत या संभाषणात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
होर्मुझची नाकेबंदी; जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पूर्णपणे रोखून धरल्याने जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. ट्रम्प यांनी दिलेले इशारे झुगारून लावत इराणने इस्रायल आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांना येथून तेलाचा एक थेंबही नेऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आशियापासून युरोपपर्यंत तेल आणि वायूच्या किमती गगनाला भिडल्या असून, अनेक देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान मोदी यांनी ही सामुद्रधुनी मानवतेच्या हितासाठी पुन्हा खुली व्हावी, अशी आग्रही भूमिका मांडली आहे.
पंतप्रधान मोदींची मध्यस्थी आणि राजनैतिक प्रयत्न
पंतप्रधान मोदींनी केवळ ट्रम्प यांच्याशीच नव्हे, तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशीही स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. याशिवाय सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), ओमान आणि बहरीन या देशांच्या नेत्यांशी संवाद साधून त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भारतात नियुक्त अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही मोदी आणि ट्रम्प यांच्यातील या संवादाच्या तपशीलाला दुजोरा दिला आहे.
Received a call from President Trump and had a useful exchange of views on the situation in West Asia. India supports de-escalation and restoration of peace at the earliest. Ensuring that the Strait of Hormuz remains open, secure and accessible is essential for the whole world.… — Narendra Modi (@narendramodi) March 24, 2026
पंतप्रधानांचे ‘X’ वरील निवेदन
पंतप्रधान मोदींनी स्वतः ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला होता. पश्चिम आशियातील तणाव निवळणे आणि लवकरात लवकर शांतता प्रस्थापित होणे याला भारताचा पूर्ण पाठिंबा आहे. ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ हे सर्वांसाठी खुले, सुरक्षित आणि सुलभ राहणे संपूर्ण जगाच्या हिताचे आहे.” शांतता आणि स्थैर्यासाठी दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.