2600 Years Old Treasure In Karnak Temple, Egypt :आज मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्या असलेला इजिप्त हा हजारो वर्षे जुन्या प्राचीन वारशाचे केंद्र असलेला देश म्हणून ओळखला जातो. या देशाच्या प्राचीन वारशाने जगभरातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास प्रेमींना आकर्षित केले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ येथे दुर्मीळ वस्तू सापडण्याच्या आशेने अनेक दशके उत्खनन करत आहेत. अशाच एका उत्खननात, पुरातत्वशास्त्रज्ञांना कर्नाक मंदिर संकुलात 2600 वर्षे जुना खजिना सापडला आहे. त्यातून सोन्याचे दागिने आणि कौटुंबिक देवतांच्या समूहाच्या मूर्तींचा भव्य खजिना मिळाला आहे.
इजिप्तच्या ऐतिहासिक कर्नाक मंदिरात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना असा खजिना सापडला की, तो पाहून सर्वजण थक्क झाले. मंदिराच्या आत 2600 वर्षे जुना एक रहस्यमय सोन्याचा साठा सापडला आहे, ज्यामध्ये देवांच्या मूर्ती देखील होत्या. हजारो वर्षांनंतरही सोन्याची झळाळी पाहून सर्वांचे डोळे दिपले.
हेही वाचा - Balochistan Train Hijack : पाकिस्तानचे रडगाणे.. बलुचिस्तान्यांचा जाफर ट्रेनवरील हल्ला हे भारत आणि तालिबानचे कारस्थान
प्राचीन इजिप्तबद्दल नवीन माहिती
या नवीन शोधामुळे 26 व्या राजवंशाच्या काळात प्राचीन इजिप्तमधील धार्मिक आणि कलात्मक पद्धतींबद्दल खूप छान माहिती मिळते. तसेच ते कर्नाक मंदिर संकुलाच्या हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर आणि विकासावर प्रकाश टाकते. कलाकृतींचे चालू संशोधन आणि जीर्णोद्धार प्राचीन इजिप्शियन लोकांच्या परंपरा आणि पद्धतींबद्दल अधिक माहिती प्रदान करते. नुकत्याच सापडलेल्या कलाकृती त्यांचा जीर्णोद्धार झाल्यानंतर लक्सर संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवल्या जातील. यामुळे इजिप्तच्या प्राचीन संस्कृती आणि धार्मिक इतिहासाबद्दल अधिक माहिती मिळेल.
कर्नाक येथील प्राचीन इजिप्तमधील महत्त्वाचे मंदिर
कर्नाक मंदिर हे इजिप्तमधील सर्वात महत्वाचे आणि सर्वात जास्त काळ टिकलेले धार्मिक संकुल म्हणून ओळखले जाते. लक्सरजवळील हे भव्य मंदिर संकुल सुमारे 4,000 वर्षांपूर्वी बांधले गेले होते आणि जवळजवळ एक हजार वर्षे सतत त्याचे नूतनीकरण आणि सुधारणा करण्यात आल्या. हे संकुल गेल्या काही शतकांपासून मोठ्या पुरातत्वीय संशोधनाचे ठिकाण राहिले आहे आणि या काळात शेकडो ऐतिहासिक शोध लागले आहेत.
देवतांच्या सोन्याच्या मूर्ती
नव्याने सापडलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे दाणे, ताईत आणि पुतळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर अगदी बारीक कलाकुसर तयार करण्यात आली आहे. या सर्व वस्तू एका तुटलेल्या भांड्यात सापडल्या, परंतु जतन करण्याच्या पद्धतीमुळे त्या जशाच्या तशा राहिल्या. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्रालयाने सांगितले की, सापडलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या आणि धातूच्या अंगठ्या तसेच तीन देवतांच्या मूर्ती समाविष्ट आहेत.
हेही वाचा - चाक राहिलं खाली अन् यांचं विमान हवेत! लँड करताना पाकिस्तानी पायलट आणि अधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट..!
उत्खननादरम्यान सापडलेल्या तीन मूर्ती प्राचीन इजिप्तच्या तीन प्रमुख देवतांचे चित्रण करतात. थेब्सचा शासक देव अमुन, त्याची पत्नी आणि मातृदेवी मुट आणि त्यांचा मुलगा खोंसू म्हणजेच, चंद्रदेवता. सुरुवातीला असे मानले जातहोते की, या मूर्तीचा ताईतामध्ये वापर करून तो शरीरावर घातला जात असे. असा ताईत गळ्यात घातल्याने संरक्षण मिळेल, असे मानले जात होते.