Volkswagen layoffs and Porsche Jobs Cut: जागतिक वाहन क्षेत्रातील मंदी आणि आर्थिक आव्हानांमुळे प्रसिद्ध जर्मन कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनने (Volkswagen) आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या फेररचनेचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या फ्युचर प्लॅन 2030 अंतर्गत तब्बल 1 लाख कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मार्च 2026 पर्यंत युनियनसोबत झालेल्या करारानुसार 50 हजार पदे स्वेच्छानिवृत्ती आणि निवृत्तीद्वारे हळूहळू कमी करण्यात येत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर 2026 मध्ये पर्यवेक्षणात्मक बोर्डाने आणखी 50 हजार नोकऱ्या कमी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. या महाकपातीचा झटका कंपनीच्या लक्झरी ब्रँड पोर्शेलाही (Porsche) बसणार असून तिथे सुमारे 9000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे.
15 टक्के मनुष्यबळावर परिणाम; 90 वर्षांतील सर्वात मोठे संकट
फॉक्सवॅगनच्या 90 वर्षांच्या इतिहासात कंपनीला पहिल्यांदाच अशा भीषण पुनर्रचनेला (Restructuring) सामोरे जावे लागत आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या एकूण मनुष्यबळापैकी सुमारे 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर थेट परिणाम होणार आहे. एकाच वेळी सर्वांना न काढता पुढील 4 वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बाजारातील बदलती परिस्थिती, कमी झालेली विक्री आणि उत्पादनाचा वाढता खर्च पाहता कंपनीने आपली उत्पादनक्षमता व कर्मचारी संख्या घटवण्याचा मार्ग निवडला आहे.
हेही वाचा – शेअर बाजारात हाहाकार! 3 तासांत गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला
अमेरिकन टॅरिफ आणि चिनी कंपन्यांच्या स्पर्धेचा मोठा फटका
कंपनीवर सध्या जगभरातून अनेक घटकांचा मोठा ताण आहे. युरोप आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी मंदावली आहे, तर चिनी कार उत्पादकांकडून तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. तसेच अमेरिकेने युरोपियन युनियनकडून आयात होणाऱ्या कार आणि ट्रक्सवरील टॅरिफ 25 टक्क्यांवरून वाढवून 30 टक्के केला आहे. जर्मनीत वाढलेला उत्पादन खर्च आणि या अमेरिकन टॅरिफमुळे फॉक्सवॅगनला वर्षाला सुमारे 5 अब्ज युरोचे थेट नुकसान सहन करावे लागत आहे.
खर्च कपातीद्वारे कामकाज टिकवण्याचा प्रयत्न
ऑलिव्हर ब्लूम (CEO Oliver Blume) यांच्या नेतृत्वाखालील फॉक्सवॅगन व्यवस्थापनासमोर आता ऑपरेटिंग प्रॉफिट टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. लक्झरी ब्रँड असलेल्या पोर्शेला टॅरिफचा फटका सर्वाधिक बसला आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी आणि कंपनीला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी मनुष्यबळ कपातीसोबतच इतर विविध क्षेत्रांतील खर्च कमी करून कामकाज अधिक कार्यक्षम बनवण्यावर कंपनी भर देत आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापूर्वी सरकारची मोठी घोषणा! थेट 30 लाखांपर्यंत सबसिडी, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या