कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टम्बलर रिज येथे बुधवारी झालेल्या भीषण गोळीबारात संशयित हल्लेखोरासह 10 जणांचा मृत्यू झाला असून किमान 25 जण जखमी झाले आहेत. ही घटना टम्बलर रिज सेकंडरी स्कूलमध्ये दुपारी सुमारे एक वाजून 20 मिनिटांनी घडली. स्थानिक पोलिसांनी तात्काळ ‘शेल्टर-इन-प्लेस’ (घरातच सुरक्षित राहा) आदेश जारी केला होता.
Royal Canadian Mounted Police (RCMP) च्या माहितीनुसार, संशयित महिला हल्लेखोर शाळेच्या परिसरात मृत अवस्थेत आढळली. प्राथमिक माहितीनुसार तिने स्वतःवर गोळी झाडल्याचा संशय आहे. शाळेत सहा जण मृत आढळले, एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर समुदायातील एका घरात दोन मृतदेह सापडले. दोन जणांना गंभीर अवस्थेत हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले.
हेही वाचा: America-Pakistan Relation : "अमेरिकेने आमचा टॉयलेट पेपरसारखा वापर केला" पाकिस्तान संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याने जागतिक राजकारणात वादाची ठिणगी
सुमारे 2,400 लोकसंख्या असलेल्या टम्बलर रिज या छोट्या शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या आहेत. सुमारे 100 विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, अशी माहिती RCMP च्या उत्तर विभाग प्रमुख केन फ्लॉइड यांनी दिली. हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही आणि दुसरा संशयित सहभागी होता का, याचीही चौकशी सुरू आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कारनी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “या अमानुष हिंसाचारामुळे ज्या कुटुंबाचे नुकसान झाले आहे, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही उभे आहोत,” असे त्यांनी सामाजिक माध्यमांवर म्हटले. ब्रिटिश कोलंबियाचे प्रीमियर डेव्हिड इबे यांनीही समुदायाला सर्वतोपरी सरकारी मदतीचे आश्वासन दिले.
टम्बलर रिज सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतचे सुमारे 175 विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा या आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. 2020 मधील नोव्हा स्कोशिया येथील भीषण हल्ल्यानंतर कॅनडाने शस्त्र नियंत्रणाचे (Gun Control) नियम कडक केले होते. मात्र, या नव्या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय सुरक्षेवर आणि शस्त्र नियंत्रणावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: India China Relations: चीनचं 'टेन्शन' वाढलं; खनिजांसाठी भारताने आखला मास्टर प्लॅन; 'या' देशांसोबत करणार ऐतिहासिक करार