India foreign policy: चीनचं आर्थिक मॉडेल आता अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांत चीनने जागतिक स्तरावर स्वतःचं एक वेगळं, स्थिर आणि प्रभावी आर्थिक मॉडेल उभं केलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला मोठं आव्हान उभं राहिलं आहे. अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स यांनी म्हटलं आहे की, 'चीनने अमेरिकेच्या मार्गाने न जाता, स्वतःचं स्वतंत्र मॉडेल विकसित करून दाखवलं आहे. त्यामुळेच अमेरिका चीनकडे वैचारिक शत्रूप्रमाणे नव्हे, तर भीतीच्या दृष्टीने पाहत आहे.'
हेही वाचा : Pakistan-US Earth Minerals Deal : दुर्मिळ पृथ्वी खनिजांची पहिली खेप पाकिस्ताननं अमेरिकेला पाठवली; दोन्ही देशांमध्ये गुप्त कराराच्या चर्चा
सॅक्स यांच्या मते, शीतयुद्धानंतर अमेरिका जगावर आर्थिक आणि राजकीय नियंत्रण राखत होती. परंतु चीनने त्या अधिपत्याला न जुमानता, स्वतःचं मॉडेल राबवलं आणि तेही यशस्वी ठरवलं. या यशामुळे अमेरिका अस्वस्थ झाली आहे. त्यामुळेच अमेरिकेने चीनविरुद्ध तंत्रज्ञान बंदी, व्यापार मर्यादा आणि आशियातील लष्करी उपस्थिती वाढवण्यासारख्या हालचाली सुरू केल्या आहेत. या दोन महासत्तांच्या संघर्षात मात्र भारताला मोठं नुकसान सहन करावं लागत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवले होते, तसेच H-1B व्हिसाच्या फीमध्येही वाढ केली होती. आता या आर्थिक दबावामुळे भारताच्या निर्यातीत आणि परदेशी रोजगारांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेकडून भारतावर दबाव टाकला जात आहे, तर दुसरीकडे चीन भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
या परिस्थितीत भारत एका कठीण समतोलाच्या स्थितीत सापडला आहे. एकीकडे अमेरिका भारताचा सामरिक मित्रदेश आहे, तर दुसरीकडे चीन हा आर्थिकदृष्ट्या प्रबळ शेजारी आहे. दोन्ही देश भारताला आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत असताना, भारताची भूमिका अत्यंत सावध आणि कूटनीतिक बनली आहे. सॅक्स यांनी स्पष्ट केलं आहे की, अमेरिका अजूनही स्वतःला जागतिक नेता समजते, पण आता बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था तयार होत आहे. चीनला अमेरिकेची जागा घ्यायची नाही, परंतु तो सहअस्तित्वावर विश्वास ठेवतो. जगात अनेक शक्ती एकत्र नांदू शकतात हे चीन सिद्ध करू इच्छितो. मात्र, अमेरिकेच्या श्रेष्ठत्वाच्या मानसिकतेमुळे ही स्पर्धा शीतयुद्धासारख्या नव्या संघर्षात रूपांतरित होऊ शकते, असा त्यांचा इशारा आहे.
हेही वाचा : Ukraine War: पुतीन यांनी ट्रम्प यांचा केला विश्वासघात; आधी नोबेलचं स्वप्न दाखवलं ,पण शेवटी...
तज्ज्ञांच्या मते, सध्याचा संघर्ष केवळ आर्थिक नाही, तर वैचारिक देखील आहे. अमेरिकेचं भांडवलशाहीवर आधारित मॉडेल आणि चीनचं राज्यनियंत्रित मॉडेल हे दोन वेगळे मार्ग आहेत. आणि जग आता पाहत आहे की चीनचं मॉडेलही यशस्वी ठरू शकतं. हीच बाब अमेरिकेच्या चिंता वाढवणारी ठरली आहे. जर ही स्पर्धा पुढे वाढली, तर जागतिक व्यापार, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रावर त्याचा खोल परिणाम होईल. अशा वेळी भारतासारख्या देशांना आपल्या हितसंबंधांचा योग्य तो समतोल राखणं ही मोठी कूटनीतिक कसोटी ठरेल.