US Protest 2025: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 18 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत त्यांच्या विरोधात अभूतपूर्व आंदोलन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘नो किंग्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मोर्चामुळे अमेरिकेच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे.
या आंदोलनाचं घोषवाक्यच स्पष्ट सांगतं "अमेरिकेत कोणीच राजा नाही." ट्रम्प यांनी लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करून सत्ता स्वतःच्या हातात केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. अमेरिकेतील हजारो कार्यकर्ते, शिक्षक, कामगार संघटना आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर उभं करणार आहेत.
हेही वाचा: Donald Trump: भारतासह पाकिस्तानलाही ट्रम्प यांची 200 टक्के टॅरिफची धमकी; म्हणाले 'टॅरिफच्या ताकदीवर...
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 2500 ठिकाणी एकाचवेळी आंदोलन होणार असून, अंदाजे 12 लाखांहून अधिक नागरिक यात सहभागी होतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी झाल्याने अमेरिकन सरकार आणि प्रशासन दोन्हीही सतर्क झाले आहेत.
‘नो किंग्स’ या आंदोलनाची मुळे चार महिन्यांपूर्वीच्या आंदोलनात सापडतात. त्यावेळी पाच लाखांहून अधिक लोकांनी ट्रम्प यांच्या “विशेष अधिकार” धोरणाविरोधात आवाज उठवला होता. आता पुन्हा एकदा नागरिकांनी ट्रम्प यांना हुकूमशाही वृत्तीचा आरोप करत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे जनतेत नाराजी वाढली आहे. सरकारी शटडाऊन जाहीर झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. काहींना जबरदस्तीची सुट्टी देण्यात आली असून, बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोकांचा रोष आता रस्त्यावर उतरला आहे.
हेही वाचा: Donald Trump : अमेरिकेचा डाव फसला! भारताचा GDP वेगाने वाढला; IMF चा अंदाज
या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे "लोकशाही वाचवा." आंदोलकांचा आरोप आहे की ट्रम्प यांनी न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून आपला राजकीय प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष आणि मीडियावर दबाव आणणं, टीकाकारांचा आवाज बंद करणं आणि स्वतःच्या हितासाठी कायद्याचे चुकीचे अर्थ लावणे या गोष्टींमुळेच जनतेचा संयम सुटला आहे.
अमेरिकेतील अनेक नामांकित बुद्धिजीवी, पत्रकार आणि मानवाधिकार संघटनांनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. “ही फक्त ट्रम्पविरोधातील लढाई नाही, तर लोकशाही टिकवण्याची चळवळ आहे,” असं अनेक नेत्यांचं मत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक देशांवर प्रचंड टॅरिफ लावून जागतिक व्यापार युद्धाला तोंड फोडलं होतं. आता त्यांच्या देशातच असंतोषाचा ज्वालामुखी फुटत आहे.
राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे आंदोलन ट्रम्प यांच्या आगामी राजकीय योजनांवर मोठा परिणाम करू शकतं. अमेरिकेत येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सरकारसाठी आणि ट्रम्पसाठी दोघांसाठीही आव्हानात्मक ठरणार आहे.
18 ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या इतिहासात लोकशाहीविषयक सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक नोंदवला जाऊ शकतो. जगभरातील राजकीय नेत्यांचं लक्ष आता या आंदोलनावर केंद्रित झालं आहे, आणि अमेरिकेतील पुढील काही दिवस तिथल्या लोकशाहीसाठी निर्णायक ठरणार आहेत.