अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यात शुक्रवारी झालेली बैठक अत्यंत तणावपूर्ण ठरल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला रशियासोबत शांततेचा करार करण्यासाठी "समझोता" करावा असा सल्ला दिला आणि चेतावणी दिली की, “जर करार झाला नाही तर पुतिन युक्रेनचा नाश करेल.”
बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वेळा जोरदार वादावादी झाल्याचे सांगितले जाते. ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्धाच्या नकाशांचा आढावा घेताना ते एकीकडे फेकल्याची माहिती एका युरोपीय अधिकाऱ्याने दिली. त्याचप्रमाणे त्यांनी डोनबास प्रदेश पूर्णपणे रशियाला देऊन युद्ध संपवावे, असा प्रस्ताव मांडल्याचेही वृत्त आहे.
ही बैठक इस्रायल–हमास संघर्षातील युद्धविरामानंतर झाली असून, ट्रम्प प्रशासनाच्या माध्यमातून रशिया–युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी नवा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत आहेत. झेलेन्स्की यांनी या बैठकीत अमेरिकेकडून दीर्घ पल्ल्याच्या टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांची मागणी केली होती, मात्र ती ट्रम्प यांनी नाकारल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Doland Trump on Gaza Plan: 48 तासांत बंदिवान सुटणार? ट्रम्प यांचा गाझा संकटावर निर्णायक प्लॅन समोर
युरोपीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी या चर्चेत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भाषणातील मुद्दे जवळपास जशाच्या तशा मांडले. काही ठिकाणी त्यांनी म्हटले की, “पुतिन म्हणतात हे युद्ध नाही, ही विशेष मोहीम आहे,” आणि झेलेन्स्कीला “करार करा, अन्यथा तुमचा देश उद्ध्वस्त होईल,” अशी धमकी दिली.
बैठकीनंतर झेलेन्स्की नाराज दिसले आणि त्यांनी युरोप व जी-20 देशांना निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले. दरम्यान, रशियाने अमेरिकेला नवा प्रस्ताव दिला असून, त्यानुसार युक्रेनने डोनबास प्रदेशाचा ताबा सोडल्यास युद्धविरामाचा विचार केला जाईल. मात्र युक्रेनने हा प्रस्ताव पूर्णतः नाकारला आहे.
युरोपीय नेत्यांच्या मते, ट्रम्प यांची भूमिका सध्या बदलत आहे आणि ते रशियाच्या अटींना दुजोरा देत असल्याने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा : Maharashtra Farmers Good News: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! केंद्राकडून मदतीचा दुसरा हप्ता जाहीर; महाराष्ट्राला मिळणार 1,566.40 कोटी