अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची आज महत्त्वपूर्ण भेट होणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या सुरु असलेल्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची ठरत आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापारविषयक तणाव शांत करून संबंध पुन्हा स्थिर करण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
बैठकीपूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की ट्रम्प चीनच्या वस्तूंवर शंभर टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आपल्या अलीकडील धमकीची अंमलबजावणी करणार नाहीत. दुसरीकडे, चीनकडूनही सकारात्मक संकेत मिळाले असून त्यांनी दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवरील निर्बंध कमी करण्याची आणि अमेरिकेतून सोयाबीन खरेदी वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. या घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण कोरियाच्या दौर्यावर असताना विमानातून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, चीनने फेंटेनाइल उत्पादनाबाबत अमेरिकेला मदत केल्यास टॅरिफ कमी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. “मला वाटते की टॅरिफ कमी केले जातील, कारण चीन या विषयावर आम्हाला मदत करेल,” असे ट्रम्प म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “सध्या चीनसोबतचे आमचे संबंध अतिशय चांगले आहेत.”
हेही वाचा: Poseidon Nuclear Drone: रशियाची आण्विक ताकद पुन्हा सिद्ध! ‘पोसायडॉन न्यूक्लियर ड्रोन’ची यशस्वी चाचणी
ही बैठक दक्षिण कोरियातील बुसान येथे होणार आहे. हा बंदरनगरीय शहर ‘एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (Asia Pacific Economic Cooperation) शिखर परिषदेतल्या मुख्य स्थळ ग्योंगजूपासून सुमारे 76 किलोमीटर अंतरावर आहे. बुधवारी रात्री APEC मधील इतर नेत्यांसोबत झालेल्या जेवणावेळी ट्रम्प यांनी सांगितले की, शी जिनपिंग यांच्यासोबत त्यांची सुमारे तीन ते चार तासांची सविस्तर चर्चा होईल आणि त्यानंतर ते थेट वॉशिंग्टनला परततील.
अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी अलीकडेच मलेशियातील कुआलालंपुर येथे भेटले होते. त्या बैठकीनंतर चीनचे प्रमुख व्यापार सल्लागार ली चेंगगांग यांनी दोन्ही देशांमध्ये प्रारंभिक करारावर सहमती झाल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनीही याला “अत्यंत सकारात्मक आणि यशस्वी चर्चा” असे संबोधले. तरीही, ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात तैवानच्या सुरक्षेसह अनेक राजकीय आणि सामरिक मुद्द्यांवर मतभेद कायम आहेत.
ही बैठक 2019 नंतर दोन्ही नेत्यांची पहिली प्रत्यक्ष भेट ठरणार आहे. त्यामुळे अमेरिका-चीन संबंधांच्या भविष्यासंदर्भात ही चर्चा निर्णायक ठरू शकते. या बैठकीतून व्यापारविषयक तणाव कमी करण्याबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य मिळवून देण्यासाठी नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Amit Shah: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार होणार का?, अमित शाहांचे स्पष्ट मत