Tuesday, November 11, 2025 10:09:59 PM

Langvin remarks on Indians in America: भारतीयांविरोधातील वक्तव्यामुळे अमेरिकेत खळबळ; फ्लोरिडातील राजकारणी चँडलर लँगविनवर कारवाई

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील पाम बे शहराचे राजकारणी चँडलर लँगविनने भारतीयांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

langvin remarks on indians in america भारतीयांविरोधातील वक्तव्यामुळे अमेरिकेत खळबळ फ्लोरिडातील राजकारणी चँडलर लँगविनवर कारवाई

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील पाम बे शहराचे राजकारणी चँडलर लँगविनने भारतीय समुदायावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. सोशल मीडियावर लँगविन याने  भारतीयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करत म्हटले होते की, “भारतीय अमेरिकेचे शोषण करण्यासाठी येतात आणि त्यांना फक्त भारताचीच काळजी असते. अमेरिका म्हणजे अमेरिकन लोकांसाठी आहे.” या विधानानंतर अमेरिकन नागरिकांसह भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. 

या वक्तव्याचा परिणाम म्हणून पाम बे सिटी कौन्सिलने शनिवारी लँगविन याच्यावर कारवाई केली आहे. परिषदेत झालेल्या मतदानात 3 विरुद्ध 2 मतांनी ठराव मंजूर करून त्याला अधिकृतरीत्या बंदी घालण्यात आली आणि काही अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या. या निर्णयानुसार, आता लँगविनला कोणताही मुद्दा कौन्सिलच्या अजेंड्यावर मांडण्यापूर्वी सर्व सदस्यांची संमती घ्यावी लागेल. तसेच, त्याला इतर आयुक्तांवर सार्वजनिक टिप्पणी करण्यास आणि समित्यांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : Donald Trump AI Video : 'मी राजा नाही...', 'No Kings'प्रदर्शनावर ट्रम्प यांनी स्वत:चाच व्हिडीओ केला शेअर, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

लँगविन याने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, “एकही भारतीय असा नाही जो अमेरिकेची खरी काळजी करतो. ते इथे फक्त आमचा आर्थिक फायदा करून भारताला समृद्ध बनवण्यासाठी येतात.” शिवाय त्याने  भारतीय व्हिसाधारकांना देशातून हाकलून देण्याची मागणी केली होती. याशिवाय, 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “आज माझा वाढदिवस आहे आणि मला फक्त एवढंच हवंय, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व भारतीयांचे व्हिसा रद्द करून त्यांना देशाबाहेर पाठवावेत.”

या वक्तव्यांमुळे अमेरिकन प्रशासन आणि नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. पाम बेचे महापौर रॉब मेडिना यांनी परिषदेत म्हटले, “अमेरिका हा स्थलांतरितांनी उभारलेला देश आहे. आपण सगळे या झेंड्याखाली एक आहोत. कोणत्याही समुदायाविषयी अशी द्वेषपूर्ण भाषा अस्वीकार्य आहे.” परिषदेत लँगविनच्या वर्तनाचा एकमुखी निषेध करण्यात आला.

तथापि, स्वतःच्या बचावासाठी लँगविनने  माध्यमांसोबत बोलताना सांगितले की, “माझे वक्तव्य भारतीय-अमेरिकन नागरिकांविरुद्ध नव्हते, तर केवळ काही तात्पुरत्या व्हिसाधारकांविषयी होते. माझा हेतू केवळ अमेरिकेच्या स्थलांतर धोरणावर चर्चा सुरू करण्याचा होता.” त्याने  पुढे म्हटले की, “मी पहिला रिपब्लिकन नाही जो वादग्रस्त ट्वीट करतोय. माझ्यावर घेतलेली कारवाई ही विचारस्वातंत्र्यावर गदा आहे, आणि मी माझी जागा सोडणार नाही.”

या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिकन राजकारणात तणाव निर्माण झाला असून, भारतीय समुदायाने या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. सामाजिक माध्यमांवर #StopHateAgainstIndians हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी या घटनेला “अमेरिकन मूल्यांवरील कलंक” असे संबोधले आहे.

हेही वाचा : Gaza Peace Talks: गाझा युद्धबंदीला मोठा धोका? हमास नागरिकांवर हल्ल्याच्या तयारीत; अमेरिकेचा कडक इशारा, “युद्धविराम मोडला तर…”


सम्बन्धित सामग्री