‘फ्लायदुबई’ विमान अपहणाच्या कटाबाबत आरोपी पायलटकडून धक्कादायक खुलासा; Plan B देखील होता तयार..

अल-हमामीने चौकशीदरम्यान आपल्या 'प्लॅन बी'चा खुलासा करताना अधिकाऱ्यांना सांगितले की, जर बेन गुरियन विमानतळावर विमान आदळवणे शक्य झाले नसते, तर...
flydubai
flydubai

Flydubai Flight Hijack Attempt: फ्लायदुबई विमान अपहरणाच्या आणि हल्ल्याच्या प्रयत्नाने संपूर्ण जगात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ओमानचा वैमानिक हमाम अल-हमामी याने विमान इस्रायलमधील तेल अवीव येथे नेऊन तेथील बेन गुरियन विमानतळावरील एखाद्या इमारतीवर किंवा दुसऱ्या विमानावर आदळवण्याचा भीषण कट रचला होता. विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीतून जात असताना सह-वैमानिक अल-हमामी याने कॉकपिटमध्येच मुख्य कॅप्टन स्मित मछार यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. मात्र, गंभीर जखमी होऊनही कॅप्टन मछार यांनी अत्यंत धैर्याने कॉकपिटबाहेर पडत प्रवाशांच्या मदतीने या हल्लेखोर पायलटाला वेळेत ताब्यात घेतले आणि मोठा अनर्थ टळला.

फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळवण्यापूर्वीच रचला होता कट
तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या चक्रावून टाकणाऱ्या जबाबात अल-हमामी याने स्पष्ट केले की, हा हल्ला ऐनवेळी सुचलेला प्रकार नव्हता, तर त्याची योजना अनेक महिन्यांपासून तयार होती. फ्लायदुबई कंपनीत नोकरीला लागण्यापूर्वीच त्याने इस्रायलला विमानसेवा देणाऱ्या एअरलाईन्सचा शोध घेतला होता आणि याच विशिष्ट हेतूने त्याने फ्लायदुबईची निवड केली होती. मुळात हा दहशतवादी हल्ला जुलै महिन्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो जुलैऐवजी पुढे ढकलला गेला असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा – ब्राझील लिहायचं सोडून थेट भारताचा उल्लेख; डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर मोठी चूक

‘प्लॅन बी’अंतर्गत अमेरिकन लष्करी तळ होता निशाण्यावर
अल-हमामीने चौकशीदरम्यान आपल्या ‘प्लॅन बी’चा खुलासा करताना अधिकाऱ्यांना सांगितले की, जर बेन गुरियन विमानतळावर विमान आदळवणे शक्य झाले नसते, तर जॉर्डनमधील एका अमेरिकन लष्करी तळावर (US Military Base) विमान नेऊन ते नष्ट करण्याची पर्यायी योजना त्याने तयार ठेवली होती. कॅप्टनला कॉकपिटमध्ये मारून विमानाचा ताबा मिळवणे आणि ते नियोजित लक्ष्यावर आदळवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. परंतु, कॅप्टन स्मित मछार यांचे शौर्य आणि विमानातील प्रवाशांची समयसूचकता यामुळे हा घातक प्लॅन पूर्णपणे धुळीस मिळाला.

तपासातून अधिक गंभीर खुलासे होण्याची शक्यता
या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा तपास आता विविध सुरक्षायंत्रणांकडून अत्यंत गांभीर्याने केला जात आहे. वैमानिकाच्या या जबानीमुळे जागतिक उड्डाण सुरक्षेवर (Aviation Security) गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची आणि नेटवर्कची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – ‘अल-कायदा’कडून फ्लायदुबई विमान अपहरणाच्या प्रयत्नाचे कौतुक; 9/11 च्या हल्ल्याशी तुलना करत अमेरिका-इस्रायलला दिला हा इशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version