India Russia Relations: भारत आणि रशियाची मैत्री दशकानुदशके मजबूत राहिली आहे. जागतिक राजकारणात अनेक बदल झाले तरी या दोन देशांतील संबंधांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. उलट, प्रत्येक कठीण काळात ही मैत्री आणखी दृढ झाली आहे. आता भारताने रशियासोबत नवा पाऊल टाकत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे रशियात भारताचा पहिलाच खत (फर्टिलायझर्स) प्रकल्प उभारण्याचा.
या प्रकल्पामुळे केवळ भारताची कृषी अर्थव्यवस्था बळकट होणार नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत-रशिया व्यावसायिक नातेसंबंधांचा नवा अध्याय सुरू होईल. त्याचबरोबर अमेरिकेच्या धोरणांना धक्का बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिका-भारत संबंधांमध्ये थोडीशी तणावाची छटा दिसली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताचा हा नवा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी ‘डोकेदुखी’ ठरू शकतो.
हेही वाचा:US Truck Crash: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं; 3 जणांचा मृत्यू; पहा थरकाप उडवणारे दृश्य
रशियात भारताचा खत प्रकल्प
मिळालेल्या माहितीनुसार, भारत रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खत उत्पादनासाठी संयुक्त उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पात राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) या तीन प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत.
रशियातील विपुल नैसर्गिक वायू, अमोनिया आणि कच्च्या मालाच्या मुबलक साठ्याचा फायदा घेऊन भारत खत उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. रशियामध्ये उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 20 लाख टन युरिया उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय धोरणांना मिळणार नवा वळण
भारताने परदेशात अशा प्रकारचा खत प्रकल्प उभारण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये जमीन अधिग्रहण, नैसर्गिक वायू आणि लॉजिस्टिक्स खर्चासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. अपेक्षित आहे की डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येतील आणि त्यावेळी या प्रकल्पाची अधिकृत घोषणा होईल.
हा करार झाल्यास भारताच्या खत आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच देशातील शेतकऱ्यांना स्थिर दरात खत पुरवठा मिळेल, ज्यामुळे कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल उचललं जाईल.
हेही वाचा: Countries Where Poverty Is Illegal: या देशांमध्ये गरीब असणं म्हणजे गुन्हा! शोधूनही सापडत नाहीत भिकारी
अमेरिकेला धक्का?
भारत आणि रशियाच्या वाढत्या जवळीकीकडे अमेरिका नेहमीच सावध नजरेने पाहत आली आहे. विशेषतः ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेने भारताला चीनविरोधी आघाडीमध्ये अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताने नेहमीच स्वतंत्र आणि संतुलित परराष्ट्र धोरण ठेवले.
रशियातील हा प्रकल्प भारताने जागतिक दबावाला न जुमानता आपले आर्थिक हित जपण्यासाठी उचललेलं पाऊल असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कूटनीतिक पातळीवर नक्कीच चर्चेचा विषय बनेल.
भारत आणि रशियाची ही नवी भागीदारी केवळ खत उत्पादनापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती दोन्ही देशांतील दीर्घकालीन आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांना नवी दिशा देईल.