Tuesday, March 10, 2026 09:31:17 PM

India-Russia Trade : रशियन तेलाला भारताचा 'खो'; जानेवारीत आयातीत 40 टक्क्यांची मोठी घट, आता 'हा' देश ठरणार नवा जोडीदार

रशियाकडून येणाऱ्या मालात 80% वाटा हा कच्च्या तेलाचा असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिन्यात रशियन तेलाची प्रत्यक्ष आयात केवळ 2.3 अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे.

india-russia trade  रशियन तेलाला भारताचा खो जानेवारीत आयातीत 40 टक्क्यांची मोठी घट आता हा देश ठरणार नवा जोडीदार

India-Russia Trade : रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवरून भारत आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला ताणतणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारताने रशियाकडून होणाऱ्या आयातीत मोठी कपात केली असून, आता भारतीय रिफायनरीज आपला मोर्चा व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या ऊर्जा उत्पादनांकडे वळवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जानेवारी महिन्यात रशियन आयातीला मोठी गळती
सोमवारी जाहीर झालेल्या जानेवारी 2026 च्या ट्रेड डेटानुसार, रशियाकडून भारताने केलेल्या एकूण आयातीत 40.48% ची प्रचंड घट झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये ही आयात 4.81 अब्ज डॉलर्स होती, ती आता घसरून 2.86 अब्ज डॉलर्सवर आली आहे. रशियाकडून येणाऱ्या मालात 80% वाटा हा कच्च्या तेलाचा असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या महिन्यात रशियन तेलाची प्रत्यक्ष आयात केवळ 2.3 अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षाही कमी असण्याची शक्यता आहे. 'रिलायन्स इंडस्ट्रीज' (RIL) सारख्या मोठ्या खाजगी रिफायनरीने जानेवारीत रशियाकडून एकही डिलिव्हरी घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचा दबाव आणि दंडात्मक टॅरिफचा परिणाम
भारत आणि रशियाच्या वाढत्या व्यापारावर अमेरिकेने सातत्याने नाराजी व्यक्त केली होती. एप्रिल 2025 मध्ये रशियन तेल आयात 4.73 अब्ज डॉलर्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली असताना अमेरिकेने 'लिबरेशन डे टॅरिफ' जाहीर केले होते. त्यानंतर 27 ऑगस्ट 2025 पासून अमेरिकेने भारतीय मालावर 25% अतिरिक्त दंडात्मक शुल्क (Punitive Tariff) लादले होते. या दबावामुळे सप्टेंबरमध्येच आयातीत 30% घट झाली होती. अखेर, भारताने रशियन तेल खरेदी कमी करण्याचे मान्य केल्यावर 6 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द केले आहे.

हेही वाचा - Stephen Schwarzman Donation: मानलं गड्या यांना; 1.3 ट्रिलियन डॉलर्सचा मालक होणार 'कफनधारी'? संपत्तीचा मोह सोडणाऱ्या या अब्जाधीशाची जगभर चर्चा

व्हेनेझुएला: भारताचा नवा 'ऊर्जा' पर्याय
रशियाला पर्याय म्हणून भारत आता पुन्हा एकदा व्हेनेझुएलाकडे वळत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर, भारतीय रिफायनर्सना तिथून स्वस्त कच्चे तेल खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 31 जानेवारी रोजीच संकेत दिले होते की, भारत आता व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करेल. 2012-13 मध्ये भारताने व्हेनेझुएलाकडून 14.10 अब्ज डॉलर्सचे तेल घेतले होते, जे 2021-22 मध्ये शून्यावर आले होते. आता हे समीकरण पुन्हा बदलणार आहे.

दशकातील चढ-उतार आणि भविष्यातील कल
भारताच्या तेल आयातीचा इतिहास पाहिला तर रशियाचा वाटा अचानक वाढला होता. 2011-12 मध्ये रशियाकडून शून्य टक्के तेल खरेदी करणारा भारत 2024-25 पर्यंत 50.28 अब्ज डॉलर्सच्या खरेदीवर पोहोचला होता. मात्र, अमेरिकेसोबतच्या नव्या करारानुसार, भारताने केवळ रशियन तेल कमी करण्याचेच नाही, तर अमेरिकेची ऊर्जा उत्पादने खरेदी करण्याचेही मान्य केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात रशियासोबतचा व्यापार अधिक घटण्याची आणि अमेरिका व व्हेनेझुएलासोबतचा व्यापार वाढण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा - Hammer Missile : भारत-फ्रान्समध्ये संरक्षण करार; आता देशातच बनणार 'हॅमर' क्षेपणास्त्र; BEL आणि Safran ची मोठी भागीदारी


सम्बन्धित सामग्री