संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यांवर भारताने जोरदार पलटवार केला आहे. इस्लामाबादने दहशतवादाला आश्रय दिला असून तथ्यांचा विपर्यास केला, असा ठपका भारताने ठेवला. पाकिस्तानच्या वक्तव्याला उत्तर देताना भारताच्या स्थायी मिशनमधील प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी "जवाब देण्याच्या अधिकाराचा" वापर केला. त्यांनी स्पष्ट केलं की, पाकिस्तानकडून पुन्हा एकदा दहशतवादाचं समर्थन आणि खोटी माहिती दिली जात आहे. "या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची नौटंकी पाहायला मिळाली. दहशतवादाचं महिमामंडन त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा अविभाज्य भाग आहे. कोणतंही नाटक किंवा मोठं खोटं सत्याला झाकू शकत नाही," असं त्या म्हणाल्या.
गहलोत यांनी शहबाज शरीफ यांनी केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या उल्लेखावर कठोर टीका केली. पाकिस्तानने दावा केला होता की, या संघर्षात सात भारतीय विमानं नुकसानीस गेली. मात्र, भारतीय वायूदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं की, त्या कारवाईदरम्यान भारताने पाच पाकिस्तानी लढाऊ विमानं आणि एक मोठं विमान पाडलं होतं.
हेही वाचा – Russian Crude Oil Imports: रशियाकडून तेल आयात कमी करण्यास भारत सहमत; पण ट्रम्पसमोर ठेवल्या ‘या’ अटी
त्यांनी पुढे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. त्या हल्ल्याची जबाबदारी "द रेझिस्टन्स फ्रंट"वर होती, मात्र पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत त्या संघटनेला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 7 मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळांवर लक्ष्यित कारवाई केली होती.
हेही वाचा – Modi-Putin Phone Call: 'खोटे आणि निराधार…'; मोदी-पुतिन चर्चेवर नाटो प्रमुखांचा दावा भारताने फेटाळला
"बहावलपूर आणि मुरीदकेतील दहशतवादी ठिकाणांवर झालेल्या कारवाईचे पुरावे सर्वांसमोर आहेत. पाकिस्तानमधील अधिकारी अशा दहशतवाद्यांना गौरवतात आणि श्रद्धांजली वाहतात. त्यामुळे त्यांच्या दुटप्पी भूमिकेबद्दल शंका उरत नाही," असं गहलोत म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानने वर्षानुवर्षे दहशतवाद पसरवला आहे. त्याच देशाने ओसामा बिन लादेनला तब्बल दहा वर्षे आश्रय दिला होता. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पंतप्रधानांकडून केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये ठामपणे स्पष्ट केलं की, पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याचं काम पुढेही सुरू राहील.