वॉशिंग्टन: भारत आणि अमेरिकेदरम्यान होणाऱ्या मोठ्या व्यापारी कराराबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचं वलय तयार झालं होतं. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय चर्चांनंतर हा करार अंतिम टप्प्यात पोहोचणार अशी अपेक्षा होती. या डीलमुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळेल आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना मोठा वाव मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता ही चर्चा अचानक थंडावल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं आणि कोणत्या कारणामुळे दोन्ही देशांमधील ही चर्चा मागे पडली, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
एका अहवालानुसार, अमेरिकेनं या चर्चेदरम्यान भारतासमोर एक अनपेक्षित अट ठेवली आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, जर भारताला टॅरिफ कमी करून व्यापार सुलभ करायचा असेल आणि आपली उत्पादने अमेरिकेच्या बाजारात अधिक प्रमाणात पोहोचवायची असतील, तर त्याआधी भारतानं अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान खरेदी करावं लागेल. ही अट केवळ संरक्षण करारापुरती नसून, अमेरिकेच्या मते भारतानं या विमानाला आपल्या दीर्घकालीन संरक्षण धोरणाचा भाग बनवावं. या अटीमुळेच व्यापार करारावरील चर्चा सध्या थांबली आहे.
हेही वाचा: Apple Watch Hypertension Alert : ग्राहकांसाठी दिलासा! आता ॲपल वॉचमध्ये मिळणार High BP अलर्ट फीचर
या संभाव्य कराराचा भारताला मोठा आर्थिक फायदा झाला असता. 2030 पर्यंत भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार पाचपट वाढवण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं होतं. यामुळे भारतातील उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळाली असती. त्याचबरोबर अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या टॅरिफमध्येही कपात होण्याची अपेक्षा होती. मात्र आता अमेरिकेच्या या अटीमुळे संपूर्ण प्रक्रियेवर विराम लागला आहे. भारताकडून अद्याप या अटीवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी धोरणात्मक आणि संरक्षण विषयक चर्चांमध्ये हा मुद्दा गांभीर्याने घेतला जात आहे.
संरक्षण क्षेत्रात भारत सध्या स्वदेशी उत्पादन आणि ‘मेक इन इंडिया’ धोरणावर भर देत असल्याने अमेरिकेचं ही प्रस्तावित अट-धोरण भारतासाठी कठीण ठरू शकतं. त्यामुळे व्यापार आणि संरक्षण दोन्ही विषयांवर संतुलन राखण्याचं आव्हान भारतासमोर उभं आहे.
दरम्यान, भारतासाठी सध्या दिलासादायक बाब म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान भारत आणि रशियामध्ये संरक्षण, ऊर्जा, आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नवे करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अमेरिका-भारत डील स्थगित झाली असली तरी, रशियासोबत होणारे नवे करार भारतासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतात. या घडामोडींमुळे सध्या जागतिक स्तरावर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे अमेरिकेसोबतची चर्चा थांबली असली, तरी दुसरीकडे रशियासोबत वाढणारा सहकार्याचा मार्ग भारताच्या आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील संतुलन राखण्यासाठी निर्णायक ठरू शकतो.
हेही वाचा: Google Year in Search 2025 : पहलगाम हल्ला नव्हे तर; नेटकऱ्यांनी गुगलवर सर्वाधिक शेफाली जरीवालाबाबत सर्च केल्या 'या' गोष्टी