इराण: मध्य-पूर्वेतील वाळवंट सध्या केवळ उष्णतेने नव्हे, तर युद्धज्वराच्या ज्वाळांनी होरपळून निघत आहे. अनेक दशकांपासून धगधगत असलेला हा संघर्ष आता एका अशा विनाशकारी वळणावर पोहोचला आहे, जिथून परतीचे सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसत आहे. इराणने युद्धाची व्याप्ती वाढवत आता केवळ इस्रायलच नव्हे, तर कुवेत, कतार आणि बहरीन यांसारख्या शांतताप्रिय शेजारील राष्ट्रांनाही युद्धाच्या आगीत ओढले आहे. रक्ताचा सडा आणि क्षेपणास्त्रांचा थरार यामुळे हा संपूर्ण भूप्रदेश सध्या विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स'ने कुवेत, कतार आणि बहरीनच्या दिशेने ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडल्याने आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने हवाई क्षेत्रात शत्रूच्या हालचालींची पुष्टी केली असून, कतारच्या दोहा शहराच्या आकाशात आजही भीषण स्फोटांचे प्रतिध्वनी उमटत आहेत. विशेष म्हणजे, बहरीनच्या हवाई संरक्षण दलाने कमालीचे शौर्य दाखवत इराणची 70 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 59 ड्रोन हवेतच नष्ट केले. 'आगीशी खेळ' करणाऱ्या इराणच्या या कृत्यामुळे आता अरब राष्ट्रेही संताप व्यक्त करत असून, या प्रादेशिक संघर्षाचे रूपांतर जागतिक महायुद्धात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे, इस्रायलने 'ईंट का जवाब पत्थर से' देण्याच्या धोरणानुसार थेट इराणच्या काळजावर म्हणजे राजधानी तेहरानवर घाला घातला आहे. इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या सरकारी टीव्ही मुख्यालयाला लक्ष्य करत डझनावारी बॉम्बचा वर्षाव केला. इराणची संवाद यंत्रणा खिळखिळी करून, त्यांचा प्रचार (प्रोपोगंडा) रोखणे हा या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. या संयुक्त हवाई हल्ल्यात आतापर्यंत 555 हून अधिक जणांना प्राण गमवावे लागल्याची आकडेवारी 'इराणी रेड क्रिसेंट'ने दिली असून, हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
हेही वाचा: India Israel Relations: मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षात भारताची ठाम भूमिका; इस्रायलच्या समर्थनाबद्दल नेतन्याहूंनी मोदींचे मानले आभार
युद्धाची ही धग केवळ इराणपुरती मर्यादित राहिलेली नाही. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या एका अचूक 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 'पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद'चा टॉप कमांडर आदहम अदनान अल-ओथमैन याला यमसदनी धाडण्यात आले आहे.
एका बाजूला लष्करी कमांडर्सचा खात्मा आणि दुसरीकडे सरकारी यंत्रणांचे पद्धतशीर नुकसान, यामुळे इराणची रणनीती सध्या पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, इराणनेही हार न मानता इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला असून, परिस्थिती 'आर या पार'च्या लढाईकडे झुकत आहे.
इस्रायलमध्ये सध्या भयावह शांतता आणि अधूनमधून वाजणारे धोक्याचे सायरन ही नवी ओळख बनली आहे. इराणकडून होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी इस्रायलची जगप्रसिद्ध 'आयरन डोम' आणि अत्याधुनिक 'आयरन बीम' यंत्रणा रात्रभर सक्रिय आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये इस्रायलच्या आकाशात क्षेपणास्त्रांची आतषबाजी आणि त्यानंतर होणारे भीषण स्फोट काळजाचा थरकाप उडवणारे आहेत. नागरिक सध्या बंकर्समध्ये आश्रय घेत असून, कधीकाळी गजबजणारी शहरे आता छावणीचे रूप धारण करत आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' या उक्तीप्रमाणे इराणची पावले पडत असल्याचे जाणकार सांगत आहेत. अमेरिकेची साथ लाभलेला इस्रायल आणि शेजारील राष्ट्रांशी उभा दावा मांडलेला इराण यांच्यातील हा संघर्ष आता केवळ दोन देशांतील युद्ध राहिला नसून, तो जागतिक अर्थव्यवस्थेला आणि शांततेला सुरुंग लावणारा ठरत आहे. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर या युद्धाची राख संपूर्ण जगावर पसरण्यास वेळ लागणार नाही.
हेही वाचा: US Israel Iran War: इराणच्या इशाऱ्याने जागतिक ऊर्जा बाजारपेठ हादरली; होर्मुझमधील तणावाचा थेट फटका भारत आणि आशियाई अर्थव्यवस्थांना बसणार?