इराणमधील प्रख्यात मानवाधिकार कार्यकर्त्या आणि 2023 च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांना पुन्हा साडेसात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिलांवरील अत्याचार आणि राजकीय दडपशाहीविरोधातील त्यांच्या लढ्यामुळे त्या दीर्घकाळापासून इराणी सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या वकिलांनी रविवारी शिक्षेबाबत माहिती दिल्यानंतर हा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे.
53 वर्षीय अभियंता आणि लेखिका असलेल्या मोहम्मदी या ‘Defenders of Human Rights Center (DHRC)’ च्या उपाध्यक्ष आहेत. या संस्थेची स्थापना नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी केली होती. इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी आणि मानवी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांना 2023 मध्ये Nobel Peace Prize प्रदान करण्यात आले. त्या काळात त्या तेहरानमधील तुरुंगामध्ये कारावास भोगत होत्या आणि त्यांच्या मुलांनी ओस्लो येथे त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला होता.
हेही वाचा: Best Bus For Students : आता परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यात अडचण नाही, विद्यार्थ्यांसाठी 'बेस्ट'चा मोठा निर्णय
नव्या निर्णयानुसार, राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध सभा आणि कट रचल्याच्या आरोपाखाली सहा वर्षे, सरकारविरोधी प्रचारासाठी दीड वर्ष अशी शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय खुस्फ शहरात दोन वर्षांचे अंतर्गत निर्वासन आणि भविष्यात सुटका झाल्यास दोन वर्षांचा प्रवासबंदी आदेशही देण्यात आला आहे. ही शिक्षा त्यांच्या आधीच सुरू असलेल्या सुमारे 14 वर्षांच्या शिक्षेत जोडली गेल्याने त्यांची एकूण शिक्षा आता 21 वर्षांहून अधिक झाली आहे.
मोहम्मदी यांना 12 डिसेंबर 2025 रोजी मशहद येथे मानवाधिकार वकील खोसरो अलीकोर्डी यांच्या स्मरणसभेत सहभागी झाल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर ‘भडकावू वक्तव्य’ केल्याचा आणि उपस्थितांना नियमभंग करणारे घोषवाक्य देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला. शिक्षेची घोषणा झाल्याच दिवशी त्यांनी सुरू केलेले आठवडाभराचे उपोषण (Hunger Strike) थांबवले गेले.
इराण सरकार आणि नरगिस मोहम्मदी यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. त्यांच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा इराणमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिलांचे अधिकार आणि मानवाधिकार यांवरील स्थितीवर जागतिक लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचा: Navnath Waghmare : तेलंगणामध्ये फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न,नवनाथ वाघमारे यांची अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी