Monday, March 09, 2026 02:59:51 AM

Israel vs Iran War: पश्चिम आशियात महायुद्धाचा वणवा; इस्रायल, अमेरिका, इराण पाठोपाठ आता 'या' देशाची एन्ट्री

बगदाद सरकार प्रतिहल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून मध्यपूर्वेतील संघर्ष प्रादेशिक महायुद्धात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे.

israel vs iran war पश्चिम आशियात महायुद्धाचा वणवा इस्रायल अमेरिका इराण पाठोपाठ आता या देशाची एन्ट्री

बगदाद: "विझू पाहणाऱ्या विस्तवाला जेव्हा सुडाची हवा मिळते, तेव्हा त्याचा वणवा व्हायला वेळ लागत नाही." पश्चिम आशियात सध्या नेमकी हीच परिस्थिती उद्भवली आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा कुटुंबासह अंत झाल्यानंतरही, युद्धाची धग यत्किंचितही कमी झालेली नाही. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूने खवळलेल्या इराणने माघार घेण्याऐवजी इस्रायल आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ल्यांची मालिका अधिकच तीव्र केली आहे. मात्र, या धगधगत्या अग्निकुंडात आता एका नव्या आणि 'चौथ्या' देशाची एन्ट्री झाली असून, यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व आशिया एका मोठ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

हा चौथा देश दुसरा तिसरा कोणी नसून इराणचा जुना वैरी 'इराक' आहे. इराणने नुकतेच शेजारील इराकी कुर्दिस्तान भागात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. आपल्या सार्वभौम भूमीवर इराणने केलेला हा थेट हल्ला इराकच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सध्या इराकमध्ये अमेरिकेच्या मर्जीतील सरकार सत्तेत आहे. त्यामुळे आपल्या हद्दीत झालेल्या या घुसखोरीचा आणि हल्ल्याचा हिशोब चुकता करण्यासाठी इराकने थेट इराणवर प्रतिहल्ला करण्याची जोरदार तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आंतरराष्ट्रीय सूत्रांकडून समोर येत आहे.

इराण आणि इराक यांच्यातील हा संघर्ष आजचा नाही. याला चार दशकांच्या रक्तरंजित इतिहासाची किनार आहे. 1980 च्या दशकात सद्दाम हुसेन यांनी 'बाथ' पक्षाची सत्ता हाती घेतल्यानंतर, पर्शियन आखातात 'महा इराक' (Greater Iraq) निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून इराणवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: IRCTC Most Ordered Food: रेल्वे प्रवासात भारतीय प्रवासी सर्वात जास्त काय खातात? IRCTC ने जाहीर केली 'टॉप' पदार्थांची यादी, पहिली पसंती ठरतोय 'हा' साधा पदार्थ

यातूनच 1990 पर्यंत चाललेले एक भीषण युद्ध जगाने पाहिले. कालांतराने अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर सद्दाम हुसेन यांची हुकूमशाही संपुष्टात आली आणि त्यांना फासावर लटकवण्यात आले. मात्र, इराण आणि इराक यांच्यातील 'वैर' कधीही संपुष्टात आले नाही. आता इराणच्या ताज्या हल्ल्याने या जुन्या जखमांवरील खपली पुन्हा एकदा काढली आहे.

दरम्यान, इराकमधील लष्करी तळांवर झालेल्या या हल्ल्याबाबत अमेरिकेने अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन टीम हॉकिन्स यांनी स्पष्ट केले आहे की, मध्य-पूर्वेत सध्या अमेरिकेचे 40 हजार सैनिक तैनात आहेत. इराकमधील तळांवर इराणने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने हवेतच यशस्वीरीत्या नष्ट केली. 

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन सैन्याचे जरी नुकसान झाले नसले तरी, इराणने थेट इराकच्या भूमीवर हल्ला केल्याने बगदादमधील सरकार प्रचंड संतप्त आहे. "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" या न्यायाने इराक आता अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इराणविरोधात थेट युद्धात उतरण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकन लष्कराचे भक्कम पाठबळ असल्याने इराकचा आत्मविश्वास दुणावला आहे. जर इराकने इराणवर अधिकृतपणे प्रतिहल्ला केला, तर या संघर्षाचे रूपांतर एका भीषण प्रादेशिक महायुद्धात होईल, ज्याच्या झळा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला बसल्याशिवाय राहणार नाहीत.

हेही वाचा: PV Sindhu: दुबईत मोठा स्फोट, थोडक्यात बचावली पी.व्ही. सिंधू; थरकाप उडवणारा अनुभव शेअर करत म्हणाली, 'परिस्थिती भयावह...'


सम्बन्धित सामग्री