Israel Airstrikes in Gaza : इस्रायलने गाझापट्टीमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जोरदार हवाई हल्ले (Airstrikes) केले, ज्यात लहान मुलांसह एकूण 81 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक रुग्णालयांनी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लागू झालेल्या युद्धविरामाला या हल्ल्यांमुळे मोठा धक्का बसला असला तरी, इस्रायलने बुधवारपासून गाझामध्ये पुन्हा शस्त्रसंधी लागू करत असल्याची घोषणा केली आहे.
नेतान्याहू यांचा 'हमास'वर युद्धविरामभंगाचा आरोप
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासवर युद्धविरामाचे उल्लंघन (Ceasefire Violation) केल्याचा आरोप करत सैन्याला जोरदार हल्ले करण्याचे आदेश दिले होते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हमासने आणखी एका युद्धकैद्याचा मृतदेह परत करण्यास विलंब करण्याची घोषणा केली. इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांमध्ये हमासच्या 30 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
हेही वाचा - Masood Azhar : पंतप्रधान मोदींनी रडवलेल्या दहशतवादी मसूद अझहरची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल
रुग्णालयांमधून धक्कादायक आकडेवारी
- या हल्ल्यांतील मृतांची आकडेवारी गाझातील विविध रुग्णालयांनी दिली आहे.
- देइर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयात 10 मृतदेह दाखल करण्यात आले, ज्यात तीन महिला आणि सहा मुलांचा समावेश होता.
- दक्षिण गाझातील खान युनिसमधील नासेर रुग्णालयाने सांगितले की, 5 हवाई हल्ल्यांतील 20 मृतदेह त्यांच्याकडे आणण्यात आले, यात 13 मुले आणि 2 महिलांचा समावेश होता.
- अल-अवदा रुग्णालयाने 14 मुलांसह 30 जणांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.
हिंसाचार वाढण्यामागील कारण
याआधी, हमासने सोमवारी एका मृत नागरिकाचे अवशेष इस्रायलला परत केले होते. मात्र, याच व्यक्तीचे अर्धे अवशेष यापूर्वीच देण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला होता. त्यानंतर नेतान्याहू यांच्या आदेशानुसार इस्रायली सैन्याने गाझामधील हमासच्या तळांवर हल्ले पुन्हा सुरू केले. दरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वान्स यांनी हिंसाचारात झालेली वाढ तात्पुरती असल्याचे सांगत, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
हेही वाचा - US-China Relations : डोनाल्ड ट्रम्प-शी जिनपिंग भेटीत मोठा निर्णय!; चीनवरील आयात शुल्कात 10 टक्क्यांची कपात