US-China Relations: जवळपास सहा वर्षांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रत्यक्ष भेट झाली. दक्षिण कोरियातील बुसान येथे गुरुवारी (30 ऑक्टोबर) झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचे संकेत मिळाले असून, बैठकीनंतर ट्रम्प यांनी चीनवरील शुल्क 10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा - US Work Permit Rule: ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश; "हजारो परदेशी कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात?”
ट्रम्प यांनी सांगितले की, फेंटानिलच्या मुद्द्यावर चीनवर 20 टक्के शुल्क लादले होते. मात्र त्यांच्या चिंता ऐकल्यानंतर ते शुल्क 10 टक्के कमी केले असून, हा निर्णय तत्काळ लागू होईल. ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. चीनवरील एकूण शुल्क 57 टक्क्यांवरून 47 टक्के करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी जाहीर केले की ते एप्रिलमध्ये चीनला अधिकृत भेट देतील आणि त्यानंतर व्यापार करारावर स्वाक्षरी होईल. यानंतर शी जिनपिंगही अमेरिकेला भेट देतील.
हेही वाचा - US-China Relations: ट्रम्प आणि शी जिनपिंग सहा वर्षांनी भेटणार; टॅरिफ वॉरला मिळू शकतो विराम
चीन पुन्हा खरेदी करणार अमेरिकन सोयाबीन
या बैठकीचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे चीन तात्काळ अमेरिकन सोयाबीनची खरेदी पुन्हा सुरू करणार आहे. ट्रम्प यांच्या शुल्कवाढीनंतर चीनने सोयाबीन आयात थांबवली होती, ज्याचा फटका अमेरिकन शेतकऱ्यांना बसला होता. आता दोन्ही देशांमधील मतभेद मोठ्या प्रमाणावर दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही बैठक अमेरिका-चीन व्यापार संबंधांमध्ये “नव्या अध्यायाची सुरुवात” ठरू शकते.