भौतिकशास्त्रात अंटार्क्टिकातील संशोधनाचा डंका! फ्रान्सिस हल्झेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी'मधील (IceCube Neutrino Observatory) अप्रतिम योगदान आणि खगोलभौतिकीय स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध लावल्याबद्दल त्यांना या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

भौतिकशास्त्रात अंटार्क्टिकातील संशोधनाचा डंका! फ्रान्सिस हल्झेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर
Francis Halzen

भौतिकशास्त्रातील या वर्षाचा प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार मंगळवारी बेल्जियमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’मधील (IceCube Neutrino Observatory) अप्रतिम योगदान आणि खगोलभौतिकीय स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध लावल्याबद्दल त्यांना या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. स्टॉकहोममधील ‘रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेस’ने या पारितोषिकाची अधिकृत घोषणा केली.

वैज्ञानिक दूरदृष्टी आणि खगोलशास्त्राचा नवा मार्ग

भौतिकशास्त्र नोबेल समितीचे अध्यक्ष मार्क पिअर्स यांनी फ्रान्सिस हॅल्झेन यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “हॅल्झेन यांनी आंतरराष्ट्रीय संशोधक आणि अभियंत्यांच्या पथकाचे नेतृत्व करत विज्ञानाला एक अत्यंत उत्कृष्ट उपकरण मिळवून दिले आहे. त्यांची जिद्द आणि वैज्ञानिक दूरदृष्टीमुळे खगोलशास्त्रातील एका नव्या पर्वाचा पाया रचला गेला आहे.” हॅल्झेन यांनी दाखवून दिलेल्या या मार्गामुळे विश्वातील गूढ कणांचा अभ्यास करणे आता अधिक सुलभ होणार आहे.

हेही वाचा – वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ 3 शास्त्रज्ञांना मिळाला जगातील सर्वोच्च सन्मान

अंटार्क्टिका दक्षिण ध्रुवावरील प्रदीर्घ संशोधन

बेल्जियममध्ये जन्मलेले 82 वर्षीय शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन हे सध्या अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते अंटार्क्टिका खंडातील दक्षिण ध्रुवावर असलेल्या विशेष संशोधन केंद्राशी जोडलेले आहेत. दक्षिण ध्रुवाच्या अत्यंत कठीण हवामानात न्यूट्रिनोंचा शोध घेण्याबाबतचे हॅल्झेन यांचे संशोधन 1980 च्या दशकापासून अविरतपणे सुरू आहे. नोबेल पारितोषिकाच्या स्वरूपात त्यांना 1 कोटी 20 लाख स्वीडिश क्रोनर (सुमारे 1.2 दशलक्ष डॉलर्स) एवढी रक्कम मिळणार आहे.

गेल्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल सन्मान

दरम्यान, गेल्या वर्षी ‘क्वांटम टनेलिंग’ या उप-अणु कणांच्या विशेष वर्तणुकीवरील संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले होते. त्यांच्या या संशोधनामुळे वैद्यकीय क्षेत्रातील एमआरआय (MRI) मशीनद्वारे अधिक अचूक मोजमाप करणे शक्य झाले, तसेच आधुनिक सेलफोन्स आणि वेगवान संगणकांच्या निर्मितीला मोठी गती मिळाली होती. यावर्षी हॅल्झेन यांच्या शोधाने भौतिकशास्त्र क्षेत्राच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number