Pakistani Leader Letter To PM Modi: पाकिस्तानमध्ये असीम मुनीर (Asim Munir) यांना सर्वोच्च नेतेपद मिळाल्यानंतर सिंध प्रांतातील नेते शफी बुरफत (Shafi Burfat) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना एक खुले पत्र लिहून महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या हातात देशाची सत्ता एकवटली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी घटनेत दुरुस्ती करून मुनीर यांच्या हाती अण्वस्त्रांचे (Nuclear Weapons) संपूर्ण नियंत्रण दिले आहे. या निर्णयामुळे केवळ पाकिस्तान नव्हे तर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत आहे.
जर्मनीतून धाडले पत्र
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील प्रमुख नेते आणि सिंधू मुत्ताहिदा महज (JSMM) या संघटनेचे अध्यक्ष शफी बुरफत यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र जर्मनीच्या फ्रँकफुर्ट शहरातून धाडले आहे. शफी बुरफत यांनी पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करणारा पत्राचा मजकूर त्यांच्या सामाजिक माध्यमांवरही सामायिक केला आहे. पाकिस्तान सध्या गंभीर आणि अस्थिर परिस्थितीतून जात आहे. धार्मिक कट्टरपंथी आणि सैन्याच्या नियंत्रणात देश गेल्यामुळे आगामी काळात मोठे संकट उभे राहण्याची भीती बुरफत यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली.
हेही वाचा - India vs Pakistan : अफगाण नागरिकांवरचे हल्ले हे 'युद्धाचे कृत्य'! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकिस्तानला दिला हादरा
अण्वस्त्र नियंत्रण आणि गंभीर आव्हान
बुरफत यांनी पत्रात लिहिले की, असीम मुनीर यांच्याकडे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण देऊन त्यांना अणुबॉम्बची मालकी देण्यात आली आहे. यामुळे केवळ सिंधच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानची विद्यमान सैन्याची रचना शेजारी देश आणि जागतिक शांततेसाठी गंभीर आव्हान बनले आहे. सिंध ही एक प्राचीन संस्कृती आणि स्वातंत्र्य प्रिय असलेला प्रांत आहे. पाकिस्तानच्या लष्करी-इस्लामिक राजवटीमुळे सिंध प्रांताचे दमन होत आहे.
तुमचे नेतृत्व लाखो प्राण वाचवू शकते
या पत्रात शफी बुरफत यांनी पंतप्रधान मोदींकडे मानवतेच्या नात्याने आवाहन केले आहे. ते म्हणाले, हे केवळ एक राजकीय विधान नाही, तर एक गंभीर इशारा आहे. बुरफत पुढे म्हणाले की, तुमचे नेतृत्व लाखो निरपराध लोकांचे आयुष्य वाचवू शकते. पाकिस्तानमधील कट्टरपंथी आणि बेजबाबदार अण्वस्त्र वर्तनामुळे संपूर्ण जगाच्या शांततेवर टांगती तलवार येऊ शकते.
'भारत प्राचीन संस्कृती, न्याय आणि सभ्यतेची भूमी'
"जोपर्यंत याचा बिमोड केला जात नाही, तोपर्यंत जगात शांतता नांदणार नाही. भारत न्याय आणि सभ्यतेची भूमी आहे. आम्हाला विश्वास आहे की, वंचित आणि दबल्या गेलेल्यांबरोबर भारत उभा राहील. आम्ही अस्तित्त्वाची लढाई लढत आहोत. यातून तुम्हीच आम्हाला वाचवू शकता," असे आवाहन त्यांनी पंतप्रधान मोदींना (Appeal to PM Modi) केले आहे.
हेही वाचा - Indian Air Force: सुखोई-राफेलची धमक पाहून पाकिस्तान गोंधळला; भारताचा जबरदस्त प्रत्युत्तर सराव