Pakistan Sent Expired Food Items to Sri Lanka: चक्रीवादळ दिटवामुळे निर्माण झालेल्या भीषण आपत्तीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेला पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या आपत्कालीन मानवतावादी मदत खेपेत धक्कादायक बाब उघड झाली आहे. कोलंबो येथील अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान अनेक पॅकेट्स कुजलेले, कालबाह्य किंवा वापरण्यायोग्य नसल्याचे आढळल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या खेपेमध्ये अन्नधान्य, वैद्यकीय साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पाकिस्तानकडून मदत पाठवण्यात आली होती. मात्र खेप आगमनानंतर तपासणी करताना अनेक कंटेनरमधील वस्तूंचा कालावधी संपलेला असल्याचे दिसून आले. यामुळे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत पाकिस्तानकडे गंभीर चिंता व्यक्त केली.
हेही वाचा – Donald Trump On Indian : आता ट्रम्प यांना ‘इंडियन’ शब्दाचंही वावडं; थेट घातली बंदी; नेमकं कारण काय?
दरम्यान, ही बाब कोलंबोने इस्लामाबादकडे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही मार्गांनी नोंदवली असून, या प्रकारामुळे पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी खराब झाली आहे. हिंद महासागर प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानसाठी हे मोठे राजनैतिक अपयश मानले जात आहे. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, निकृष्ट व कालबाह्य मदत पाठवून पाकिस्तानने मानवतावादी मदतीची गुणवत्ता व प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
तथापी, पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नाही. 2015 च्या नेपाळ भूकंपात, पाकिस्तानने हिंदू बहुल देशात गोमांसापासून बनवलेले रेडी-टू-ईट पदार्थ पाठवल्याने त्यांच्यावर सांस्कृतिक असंवेदनशीलतेचे आरोप झाले होते. या नव्या प्रकरणानंतर श्रीलंकेच्या नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला आहे. अनेकांनी याला अपमानास्पद असे संबोधले असून, श्रीलंकन सरकारने पाकिस्तानकडून जबाबदारीची मागणी करावी, अशीही मागणी होत आहे. कोलंबोमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की यापुढे इतर देशांकडून येणाऱ्या मदतखेपा स्वीकारताना अधिक कठोर तपासणी प्रोटोकॉल लागू करण्यात येणार आहेत, विशेषतः अशा देशांकडून ज्यांचा निकृष्ट किंवा कालबाह्य वस्तू पाठवण्याचा इतिहास आहे. या प्रकरणामुळे पाकिस्तानच्या मदत कूटनीतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.